मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 08:13 IST2025-11-04T08:13:31+5:302025-11-04T08:13:55+5:30
निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे.

मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मुंबईहून कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्यांची एकमेकांना धडक बसली. यामुळे धावत्या लोकलकडून पडल्याने पाच प्रवाशांचा मृत्यू, तर नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या घटनेच्या ४ महिन्यांनंतर मध्य रेल्वेच्या दोन विभागीय अभियंत्यांवर लोहमार्ग पोलिसांनी शनिवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणा, ट्रॅक मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे कारण सांगत अभियंत्यांची नावे गुपित ठेवण्यात आली आहेत. अपघातातरेल्वेची कोणतीही चूक नाही. प्रवाशांच्या बॅगांमुळे अपघात झाल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला होता. मात्र, रेल्वेचा तो दावा फोल ठरला, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त सुधाकर शिरसाट यांनी सोमवारी दिली.
रेल्वेला त्यांनी सहकार्य करण्यासाठी तपासी पथकाने पत्रे दिली होती. मात्र, त्यानंतरही रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १९ जून रोजी प्रसिद्ध केले होते.
फोटो, व्हिडीओ व्हायरल
दोन ट्रॅकमधील अंतर हे ट्रॅकच्या मध्यापासून ५.३ मीटर असते, तर ट्रॅकच्या दोन्ही समोरासमोरील बाजूपासून ३.६ मीटर एवढे असते. लोकल एकमेकांना क्रॉस करताना सुमारे १.८ मीटर म्हणजेच ५, ६ फूट अंतर असते. वळणदार भागातही तेवढेच हवे असते. या तांत्रिक बाबींचा तपास अधिकाऱ्यांनी अभ्यास केला. अपघात घडल्यानंतर रेल्वेने त्यांच्या तांत्रिक टीमच्या मदतीने अपघाताच्या ठिकाणी रुळांमधील अंतर किती होते, याची मोजणी केली. त्याचे फोटो, व्हिडीओ व्हायरल झाले होते.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने मुंब्रा दुर्घटनेची सखोल चौकशी केली आहे. यामागील कारणे शोधली आहेत. संबंधित मार्गांवरील रेल्वेचे परिचालन सुरळीतपणे सुरू आहे.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे