“२०२४ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार,” वक्तव्य कानी पडलं अन् काँग्रेस नेत्यानं व्यासपीठच सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 20:05 IST2022-06-18T20:04:52+5:302022-06-18T20:05:19+5:30
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याने भाजपाच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालीये.

“२०२४ मध्ये मोदी पुन्हा निवडून येणार,” वक्तव्य कानी पडलं अन् काँग्रेस नेत्यानं व्यासपीठच सोडलं
मयुरी चव्हाण
डोंबिवली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना ईडीने नोटीस बजावल्याने भाजपाच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झालीये. अशातच डोंबिवलीमध्ये एका कार्यक्रमात भाजपा नेत्याने २०२४ मध्ये पुन्हा मोदी सारकारच निवडूण येणार अस आपल्या भाषणात उल्लेख केला. त्यानंतर व्यासपीठावर असलेल्या काँग्रेस नेत्याचा पारा चांगलाचं चढला. हे वाक्य कानी पडताच काँग्रेस नेत्याने व्यासपीठावरुन काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. अखेर इतर मान्यवरांनी हस्तक्षेप केल्यानंतर काँग्रेस नेत्याने पुन्हा आसन ग्रहण केले.
लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती मार्फत दि.बा.पाटील यांच्या २४ जून रोजी स्मृती दिनाच्या नियोजनाची पूर्वतयारीची चर्चा करण्यासाठी शनिवारी सायंकाळी प्रगती कॉलेज डोंबिवली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला सर्व पक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आजी माजी लोकप्रतिनीधी, नगरसेवक व समाजातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जगन्नाथ पाटील यांनी आपले मनोगत मांडताना मोदी २०२४ मध्ये पुन्हा निवडून येतील असे विधान केले. यावरच ते थांबले नाही तर कल्याण लोकसभेचे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही कमी मतदान होईल असं विधानही पाटील यांनी केलं. यावेळी काही काळ सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी यावर संताप व्यक्त करत त्या ठिकाणाहून निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु इतर उपस्थित लोकांनी केणे यांची मनधरणी केली त्यानंतर पुन्हा ते आपल्या जागेवर बसले. हा विषय सामाजिक असल्याने यात राजकारण आणण्याची गरज नव्हती. कोण निवडून येईल ते लोकं ठरवतील अशी प्रतिक्रिया संतोष केणे यांनी दिली. तर पाटील यांनी बोलण्यास नकार दिला.