भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 09:24 IST2025-12-04T09:23:38+5:302025-12-04T09:24:28+5:30
कनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरूच आहे

भाजपाचं धक्कातंत्र सुरूच...! श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातील शिंदेसेनेचे बडे नेते लावले गळाला
डोंबिवली - मागील काही महिन्यांपासून भाजपा आणि शिंदेसेना यांच्यातील वाद वाढला आहे. त्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का देणे सुरूच ठेवले आहे. नुकतेच शिंदेसेनेचे स्थानिक नेते अभिजीत थरवळ यांच्यासह अनेक युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. अभिजीत हे शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा आहे. मागील १५ वर्षापासून अभिजीत थरवळ राजकारणात सक्रीय असून ते युवासेनेचे पदाधिकारी होते. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू आहे. त्यात विरोधकांसह मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेलाही भाजपाने धक्का दिला आहे.
एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात शिंदेसेनेतील नेत्यांना भाजपात घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे. या पक्षप्रवेशावरून काही दिवसांपूर्वी शिंदे नाराज झाले होते. त्यांची ही नाराजी उघडपणे दिसली जेव्हा शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीला गैरहजेरी लावली. फडणवीसांच्या नेतृत्वातील या बैठकीकडे शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी पाठ फिरवल्याने नाराजीची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत पक्षप्रवेशाबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु सुरुवात तुम्ही केली होती, आम्ही केले तर चालणार नाही असं होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी बजावले होते.
🪷 तुमची आमची भाजपा सर्वांची 🪷
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 3, 2025
डोंबिवली येथे दुपारी १ वाजता भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा परिवारात प्रवेश.
📍पक्ष प्रवेश करणारे मान्यवर-
शिवसेनेचे अभिजीत थरवळ, प्रशांत सावंत, अभिजीत विचारे,… pic.twitter.com/vijOVaP9sh
या भेटीनंतर शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमासमोर येत यापुढे दोन्ही पक्षात एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत असं ठरल्याचे सांगितले. परंतु त्यानंतरही भाजपा आणि शिंदेसेनेत कुरघोडी सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मालवण येथे शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरी पैशाची बॅग पकडून दिली तेव्हा थेट रवींद्र चव्हाणांवर त्यांनी हल्लाबोल केला. मग चव्हाणांनीही त्यावर प्रतिक्रिया देताना मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असं विधान केले त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
शिंदेसेनेतील नेत्यांचा भाजपात प्रवेश
दरम्यान, शिंदेसेनेचे अभिजीत थरवळ, प्रशांत सावंत, अभिजीत विचारे, लक्ष्मीकांत अंबरकर, प्रदीप चव्हाण, विनय घरत, मयूर पाटील, सर्वेश पाटील, योगेश शिंदे, ओमकार शिर्के, प्रतीक सोनी, ओमकार देवधर, प्रिन्स गुप्ता, दर्शन मकवाना, राहुल म्हात्रे, गोपाळ देशपांडे, विरम वोरा, नील प्रजापती, कौशभ मक्वाना, प्रितेश भोसले, प्रजित अमीन, सर्वेश साईल यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात सहभागी झाले. त्याआधी बुधवारी सकाळी कल्याण ग्रामीणचे शिंदेसेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसले यांनीही भाजपात प्रवेश केला.