लोकलला तब्बल ४० मिनिटे उशीर; प्रवासी संतापले; बदलापूरकर व आरपीएफ जवानांमध्ये बाचाबाची
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:27 IST2025-10-15T08:27:02+5:302025-10-15T08:27:28+5:30
रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरू असून त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे, अशा शब्दांत अनेकांनी संपात व्यक्त केला. यावेळी संतप्त प्रवाशांची रेल्वे आरपीएफ जवानांसोबत बाचाबाची झाली.

लोकलला तब्बल ४० मिनिटे उशीर; प्रवासी संतापले; बदलापूरकर व आरपीएफ जवानांमध्ये बाचाबाची
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी खोपोलीहून येणारी लोकल तब्बल ४० मिनिटे उशिरा आल्याने प्रवाशांच्या संयमाचा बांध तुटला. प्रवासी प्रचंड संतप्त झाले.
रेल्वेचा अनागोंदी कारभार सुरू असून त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे, अशा शब्दांत अनेकांनी संपात व्यक्त केला. यावेळी संतप्त प्रवाशांची रेल्वे आरपीएफ जवानांसोबत बाचाबाची झाली.
बदलापूर रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी अन् रेटारेटी
बदलापूर स्थानकात कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली होती. लोकल पकडण्यासाठी रेटारेटी झाली. गे ले काही दिवस कर्जत येथील रेल्वेच्या कामांमुळे मेगाब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे लोकलसेवेचे नियोजन पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे. मेगाब्लॉकमुळे बदलापूरच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना रस्तेमार्गे घर गाठावे लागत असून, रिक्षा व खासगी वाहतूक करणाऱ्यांकडून लूट सुरू आहे.
नेमके काय घडले?
चार दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकात अशाच प्रकारे प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाला होता. मंगळवारी सकाळी ७ वाजून १४ मिनिटांच्या सुमारास पुन्हा तेच घडले. बदलापूरकरांनी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानकात गर्दी केली होती.
मात्र, रेल्वेने खोपोलीहून येणाऱ्या लोकलऐवजी आधी एक्स्प्रेस जाऊ दिल्याने लोकल ४० मिनिटे उशिरा आली. रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली. बदलापूर स्थानकात प्रवाशांची इतकी प्रचंड गर्दी झाली. गर्दीला नियंत्रणात ठेवण्याकरिता पाचारण केलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांचे वाद झाले.