केडीएमसीची मालमत्ता आणि पाणीपट्टी करासाठी अभय योजना नाही, लवकर कर भरा अन्यथा २ टक्के विलंब शुल्क भरावे लागेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 18:18 IST2026-02-18T18:17:29+5:302026-02-18T18:18:44+5:30
महापालिका हद्दीतील करधारकांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्यात आली आहेत. तसेच थकबाकीदारांना ना्ेटिसा बजावण्यात आल्या आहेत...

केडीएमसीची मालमत्ता आणि पाणीपट्टी करासाठी अभय योजना नाही, लवकर कर भरा अन्यथा २ टक्के विलंब शुल्क भरावे लागेल
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मालमत्ता आणि पाणीपट्टी कराकरीता अभय योजना लागू करण्याचे विचाराधीन नाही. त्यामुळे नागरीकांनी संभ्रमात राहू नये. त्यांनी त्यांच्या चालू वर्षाचा मालमत्ता आणि पाणीपट्टी कर आणि थकबाकी असल्यास थकबाकीची रक्कम भरावी असे आवाहन महापालिकेच्या कर वसूली विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केली आहे.
महापालिका हद्दीतील करधारकांना मालमत्ता कराची बिले वाटप करण्यात आली आहेत. तसेच थकबाकीदारांना ना्ेटिसा बजावण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराच्या चालू वर्षाचे बिल आणि थकीत रक्कम महापालिकेत जमा करणे आवश्यक आहे. मालमत्ताधारकांनी रक्कम भरली नाही तर दर महा २ टक्के विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. मालमत्ताधारकांना कर भरण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर कारवाई सुरुवात केली असून, स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करणे, कोणतीही पुर्वसूचना न देता नळ जोडणी खंडीत करण्यात येत आहे. त्याचबरोबर जप्त केलेल्या मालमत्तांचा जाहिर लिलावाने विक्री करण्याचा निर्णय प्रक्रियेत आहे.
महापालिकेने २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षात अभय योजना राबविण्यात आली होती. यावर्षीही महापालिकेकडून अभय योजना राबविली जाईल असा मालमत्ताधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता मालमत्ता आणि पाणीपटटी कर वसूलीकरीता अभय योजना लागू करण्याचे प्रशासनाच्या विचाराधीन नाही. त्यामुळे करदात्यांनी आपला संपूर्ण मालमता आणि पाणीपटटी कर ३१ मार्च अखेरपर्यंत भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त चव्हाण यांनी केले आहे. अन्यथा दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.