कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपी विशाल गवळीला सात दिवसांची पोलीस कोठडी; पत्नीनेही दिली होती साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 12:57 IST2024-12-26T12:55:19+5:302024-12-26T12:57:15+5:30
कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली.

कल्याण अत्याचार-खून प्रकरणः आरोपी विशाल गवळीला सात दिवसांची पोलीस कोठडी; पत्नीनेही दिली होती साथ
कल्याणमध्ये १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या करणारा नराधम विशाल गवळी याला शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी विशाल गवळी याला आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यात आरोपीला त्याच्या पत्नीनेही साथ दिली होती. पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिलाही २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मिळालेली माहिती अशी, काल कल्याण येथून एक १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.मंगळवारी भिवंडी नजीकच्या बापगाव परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. चौकशीत तो कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीचाच असल्याचे समोर आले.
राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये
दरम्यान मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी मुलगी जाताना दिसली पण पुन्हा येताना दिसली नाही. त्याठिकाणी तपास केला असता एका घराच्या परिसरात रक्ताचे डाग पडलेले असल्याने तेथे राहणा-या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीवर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने विशालने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या केल्याची कबुली दिली. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता रहात्या घरी विशालने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तीची हत्या केली. तिचा मृतदेह मोठया बॅगेत लपविला. सात वाजता बँकेत काम करणारी त्याची पत्नी साक्षी घरी आली असता तिला घडलेला प्रकार विशालने सांगितला.
हे ऐकल्यावर तिला धक्काच बसला. दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे ठरविले. आधी घरात पडलेले रक्त पुसून टाकले आणि रात्री साडेआठला मित्राची रिक्षा बोलावून घेतली. रात्री नऊ वाजता स्वत: रिक्षा चालवित विशाल पत्नीसह मृतदेह असलेली बॅग घेऊन बापगावला गेला. त्याठिकाणी मृतदेह फेकून दोघे घरी परतत असताना विशालने आधारवाडी चौकात दारूची बाटली विकत घेतली आणि तेथूनच तो पत्नी साक्षीच्या गावी शेगाव येथे निघून गेला. तर साक्षी घरी परतली. पोलिसांनी साक्षीची चौकशी केल्यावर तिने हा सर्व उलगडा केला.