Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 21:57 IST2025-05-20T21:56:40+5:302025-05-20T21:57:29+5:30
Kalyan Saptashrungi Building Collapses: कल्याणमध्ये रहिवाशी इमारतीचे छत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला.

Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा भागात आज (मंगळवारी, २० मे २०२०) दुपारी चार मजली इमारतीचे छत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी आर्थिक मदतची घोषणा केली.
In a tragic incident in Kalyan, the roof of a building collapsed, unfortunately causing loss of lives of 6 citizens.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 20, 2025
My humble tributes to them.
We stand strongly with the families in these difficult times.
The rescue operations at the site has been completed, and the Municipal…
"कल्याणमध्ये एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सहा नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या ठिकाणी बचावकार्य आता पूर्ण झाले असून महापालिका आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून आहे. जखमींची प्रकृती सुखरुप आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मी ईश्वरचरणी करतो. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे ५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येतील", अशी पोस्ट फडणवीस यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून करण्यात आली.
मृतांमध्ये दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश
या घटनेची माहिती मिळताच अग्निशनम दल, महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला आठ जणांना या ढिगाऱ्याकडून बाहेर काढण्यात आले. यातील सहा जणांचा मृत्यू झाला. इतर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.
दुर्घटनाग्रस्त इमारत ४० वर्षे जुनी
सप्तश्रृंगी असे दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव असून ती ४० वर्षे जुनी धोकादायक इमारतींच्या यादीत आहे. नागरिकांना मान्सून पूर्वी इमारत रिकामी करण्यास सांगण्यात आले होते, असे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.