नाल्यात पडून मुलाचा मृत्यू प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:09 IST2025-10-08T09:08:51+5:302025-10-08T09:09:07+5:30
आयुक्तांना नोटीस, उत्तर सादर करण्याचे निर्देश

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डोंबिवलीतील तेरा वर्षीय आयुष कदम याचा नाल्यात पडून मृत्यू झाला होता. याप्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने एमएमआरडीएचे महानगर आयुक्त व कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अनंत बदर यांनी दिले आहेत. ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत आयोगाने याप्रकरणी स्युमोटो म्हणजेच स्वत:हून दखल घेतली होती.
डोंबिवलीतील सरोवर नगर येथे गटार व नाल्याचे काम करताना गटाराचे झाकण बाजूला करून ठेवण्यात आलेले होते, त्यामुळे त्या उघड्या मॅनहोलमधून गटारात पडून आयूष कदमचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दोन तास शोधमोहीम राबवल्यानंतर अपघातस्थळापासून ३०० फूट अंतरावर त्याचा मृतदेह सापडला होता. रिंग रूटच्या कामाचा भाग म्हणून या ठिकाणी नाल्याचे काम सुरू होते. या प्रकरणाची आयोगाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकारात मानवी हक्कांचे संरक्षण करण्यात निष्काळजीपणा झाल्याचे दिसून येत असल्याचे निरीक्षण मानवाधिकार आयोगाने नोंदविले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आठ डिसेंबरला ठेवण्यात आली असल्याची माहिती मानवाधिकार आयोगाचे प्रबंधक विजय केदार यांनी दिली.