'एक्सपायरी डेट' गेलेल्या बीअरने तब्येत बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 11:02 IST2025-10-29T11:02:40+5:302025-10-29T11:02:59+5:30
कल्याण : आपण कुठलीही वस्तू घेताना त्याची एक्सपायरी तारीख हमखास पाहतो. मात्र, दारू घेताना त्याची एक्सपायरी कधीच पाहिली जात ...

'एक्सपायरी डेट' गेलेल्या बीअरने तब्येत बिघडली
कल्याण : आपण कुठलीही वस्तू घेताना त्याची एक्सपायरी तारीख हमखास पाहतो. मात्र, दारू घेताना त्याची एक्सपायरी कधीच पाहिली जात नाही आणि तेच कल्याणमधील एकाला महागात पडले. एक्सापायरी डेटची बीअर प्यायल्याने तब्येत खालावली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. दरम्यान, हा प्रकार कळताच उत्पादन शुल्क विभागाने रियल बीअर शॉपच्या विरोधात कारवाई करत एक्सपायरी डेटच्या बिअरचा साठा जप्त केला आहे.
कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात राहणारे अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री दोन बिअरच्या बाटल्या रिअल बीअर शॉपमधून विकत घेतल्या. बिअर प्यायल्यानंतर त्यांची तब्येत अचानक खालावली. घरच्यांनी तातडीने अजय यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. म्हात्रे यांच्या मित्रांनी दुकानात काही प्रमाणात एक्सपायरी डेटच्या बिअर सापडल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना दिली. पोलिसांनी कल्याणच्या उत्पादन शुल्क विभागाला कळवले. त्यानंतर मंगळवारी सकाळी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दुकानात दाखल झाले. बीअर शॉपमध्ये ठेवलेल्या सर्व प्रकारच्या दारूची तपासणी केली.
एक्सपायरी डेटचे ४३ कॅन
उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील कणसे म्हणाले, बिअरच्या १४ बाटल्या आणि ४३ कॅन एक्सपायरी डेट गेल्याचे सापडले. त्यांची एक्सपायरी डेट तीन महिने आणि पाच महिन्यापूर्वी संपुष्टात आलेली आहे.
परवाना रद्द करणार?
एक्सपायरी डेट असलेल्या बिअरच्या बाटल्या आणि कॅन जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भातील कारवाईचा अहवाल उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे.
तो अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाईल. त्यानुसार संबंधित दुकानदाराच्या विरोधात परवाना रद्द करायचा की दंडात्मक कारवाई करायची याचा निर्णय होईल.