गवळीला वाटते एन्काउंटर होण्याची भीती; कोठडीत दोन दिवसांची वाढ; आरोपीच्या वकिलाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 07:21 IST2025-01-03T07:20:44+5:302025-01-03T07:21:23+5:30
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकला. हा मोबाइल सापडलेला नाही.

गवळीला वाटते एन्काउंटर होण्याची भीती; कोठडीत दोन दिवसांची वाढ; आरोपीच्या वकिलाचा दावा
कल्याण : अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी या दोघांच्या कोठडीत गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा जसा एन्काउंटर झाला, तसाच गवळीचा एन्काउंटर होण्याची भीती त्याच्या वकिलांनी व्यक्त केली. त्यामुळे गवळीच्या नातेवाइकांना त्याच्या संपर्कात राहण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती वकिलांनी केली.
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने गवळी आणि त्याच्या पत्नीला गुरुवारी जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे यांच्यासमोर हजर केले. तेव्हा सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी युक्तिवाद केला की, गवळीने पळून जाताना सिम कार्ड काढले व मोबाइल कसारा घाटात फेकला. हा मोबाइल सापडलेला नाही.
आरोपीच्या वकिलांना धमकी
गवळीचे वकीलपत्र धनके यांनी घेतले. धनके यांनी यापूर्वी शिंदे याचे वकीलपत्र घेतले होते. कल्याणमधील मराठी तरुणाला मारहाण करणारा आरोपी अखिलेश शुक्ला याचेही वकीलपत्र धनके यांनीच घेतले. या प्रकरणात त्यांना धमकी देण्यात आली होती. याबाबत धनके यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तपासात काय आढळले?
- पोलिसांनी आरोपीकडून त्याचे कपडे, चप्पल आणि त्याने पीडित मुलीचा मृतदेह फेकण्यासाठी वापरलेली रिक्षा जप्त केली. पोलिसांनी आरोपीकडील १२ हजार १८६ रुपयांची रोकड जप्त केली.
- पीडित मुलीचे रक्ताने माखलेले कपडे, रक्ताने माखलेला मांसाचा तुकडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. ते कपडे टाकण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांना हस्तगत करायची आहे.
- आरोपी राहत असलेल्या घराचा परिसर, आरोपीने घर ते मृतदेह फेकण्याचे ठिकाण, आराेपीचे देवीकृपा आणि लीला बार या ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज मिळविले आहे.
साक्षी घेणार घटस्फोट
- आरोपीची पत्नी साक्षी हिचे वकील प्रियेश सिंग यांनी सांगितले की, गवळी याची पत्नी साक्षी हिने घडलेला गुन्हा लपवला हा तिच्यावर आराेप आहे.
- पीडित मुलीचा मृतदेह बॅगेत भरून फेकून देण्यासाठी नेताना ती सोबत होती.
- मात्र, त्या बॅगेत काय हाेते? हे तिला माहिती नव्हते. तसेच साक्षी विशालपासून घटस्फोट घेणार आहे.
आरोपीच्या वकिलाचा अर्ज
गवळीचे वकील संजय धनके यांनी न्यायालयाकडे अर्ज केला की, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला. तोच प्रकार गवळीसोबत व्हायला नको. त्यामुळे त्याच्या नातेवाइकांना त्याच्या संपर्कात राहण्याची अनुमती द्यावी. शिंदेचा एन्काउंटर फेक होता की खरा याचा तपास अजून बाकी आहे.
बॅगेचा शोध सुरू
गवळीने पीडित मुलीचा मृतदेह ज्या बॅगेत भरून नेला ती बॅग कल्याणनजीक खाडीत फेकली. त्या बॅगेचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी विनंती पोलिसांनी केली.