गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 01:01 AM2020-11-30T01:01:32+5:302020-11-30T01:01:50+5:30

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती.

Fewer patients compared to Ganeshotsav; Possibility of second wave, KDMC's health system ready | गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

गणेशोत्सवाच्या तुलनेत रुग्ण कमीच; दुसऱ्या लाटेची शक्यता, केडीएमसीची आरोग्य यंत्रणा सज्ज

Next

मुरलीधर भवार/ सदानंद नाईक 

कल्याण : केडीएमसी हद्दीत कोरोना रुग्णांच्या संख्येने जुलैमध्ये उच्चांक गाठला होता. पुढे गणेशोत्सवात नागरिक एकत्र आले. त्यामुळे या उत्सवानंतर रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मात्र, दिवाळीनंतर आता तितक्या वेगाने रुग्णसंख्या वाढताना दिसत नाही. सध्या दररोज २०० च्या आतच रुग्ण आढळत असल्याने ही रुग्णसंख्या स्थिरावल्याचा दावा केडीएमसीच्या आरोग्य विभागाने केला आहे. दरम्यान, डिसेंबरअखेरपर्यंत दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्याकरिता आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात येत आहे.

जूनपासून अनलॉक सुरू झाले. त्यानंतर गणेशोत्सवात नागरिकांनी खूपच सूट घेतली. त्याचाच परिणाम म्हणून गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढली होती. दिवसाला कोरोनाचे किमान ४०० नवे रुग्ण आढळत होते. काही वेळेस तर ही संख्या ४८५ पर्यंत गेली होती. कल्याण पश्चिमेतील जोशी बागेतील एका इमारतीतील एकाच कुटुंबातील ३३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. कारण, हे कुटुंब गणेशोत्सवात एकत्र आले होते. त्यामुळे दिवाळीतही असेच चित्र पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र, प्रत्यक्षात दिवाळीनंतर दररोज १५० ते २०० च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. ही बाब निश्चितच दिलासा देणारी आहे.

उल्हासनगरात दुसऱ्या लाटेची शक्यता फेटाळली 

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी सांगितले. दुसरी लाट आल्यास महापालिका यंत्रणा सक्षम असून त्यासाठी प्लॅटिनम हॉस्पिटल सज्ज ठेवणार असल्याचे संकेत महापालिका आरोग्य विभागाने दिले.

उल्हासनगरात शनिवारी कोरोना रुग्णांची एकूण संख्या १० हजार ७७६ असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४७ टक्के आहे. एकूण ३५४ जणांचा मृत्यू झाला. आजमितीस एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २४२ आहे. एकूण १० हजार १८० रुग्ण बरे झाले असल्याचे रिजवानी यांनी सांगितले. शहरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता सध्या तरी त्यांनी फेटाळून लावली. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर महापालिकांत रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगून त्यांनी चिंता व्यक्त केली. शहरात प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. 

Web Title: Fewer patients compared to Ganeshotsav; Possibility of second wave, KDMC's health system ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.