डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 20:00 IST2025-12-13T19:46:20+5:302025-12-13T20:00:26+5:30
एक रस्ता गुलाबी रंगाचा झाल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
Dombivli Pink Road:डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. एमआयडीसीच्या फेज दोन भागात शनिवारी सकाळी अचानक एक रस्ता गुलाबी रंगाचा झाल्याने परिसरातील रहिवासी आणि उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यापूर्वी याच भागात हिरवा पाऊस, लाल रस्ता अशा अनेक विचित्र घटना घडल्या आहेत. आता गुलाबी रस्त्याच्या प्रकरणानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण विभागाने एमआयडीसी आणि संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
रस्त्यावर गुलाबी रसायन
एमआयडीसीच्या टप्पा दोन भागातील 'मालवण किनारा हॉटेल' समोरील रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना हा गुलाबी रस्ता पाहायला मिळाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात रसायनमिश्रित गाळ मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचे आणि त्याचाच परिणाम म्हणून रस्त्याने गुलाबी रंग धारण केल्याचे दिसून आले. या केमिकलमुळे परिसरात तीव्र वास येत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी केली.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीचे अधिकारी, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी आणि क्षेत्रीय अधिकारी राजेश नांदगावकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान, एमआयडीसीकडून या भागातील गटारातील गाळ काढण्याचे काम सुरू होते आणि हा गाळ रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आला होता. याच गाळातून रासायनिक पाणी बाहेर पडून रस्त्यावर पसरल्याने हा रंग बदल झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या गंभीर प्रदूषण प्रकरणी एमपीसीबीच्या कल्याण विभागाने तातडीने कारवाई करत एमआयडीसी आणि गटार साफसफाईच्या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.
पाच वर्षांनंतर पुन्हा तोच प्रश्न
पाच वर्षांपूर्वी याच भागात रस्ते गुलाबी झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी परिसराची पाहणी करून प्रदूषण थांबवण्याचे किंवा कंपन्यांना टाळे लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरच्या सर्वेक्षणामध्ये १५६ कारखाने अतिधोकादायक आणि धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते आणि हे कारखाने इतरत्र हलवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा तीच समस्या उभी राहिल्याने, अधिकारी वर्ग याकडे लक्ष देणार का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.
या प्रकरणानंतर डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील नाल्यांची स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात तथ्ये तपासली जातील मग कारवाई करु असं पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं. "तथ्ये तपासून पाहीन, कुठेही रस्ते गुलाबी झाल्याची माहिती प्राप्त झालेली नाही. पाण्यामध्ये प्रदूषण झाल्याने काही केमिकल रिअॅक्शन झालीय का हे तपासून पाहिले जाईल, असे काही असल्यास त्यावर कारवाई केली जाईल," असे पंकजा मुंडे म्हणाल्या.