डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:17 IST2025-07-01T21:15:15+5:302025-07-01T21:17:52+5:30
चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले आहे.

डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
मयुरी चव्हाण काकडे -
कल्याण डोंबिवली शहराच्या रंगतदार राजकारणामध्ये येणाऱ्या दिवसात अजून नवनवीन ट्विस्ट येणार आहेत. डोंबिवलीचेभाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे... कल्याण डोंबिवलीत कायमच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असते. महापालिकेमध्ये एकत्रित हे दोन्ही पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून नांदत असले तरी एकमेकांवर वरचढ होण्याचे दोन्ही पक्षांचे मनसुबे काही लपून राहिलेले नाही. त्यातच आता आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.
चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये चर्चा सुरू झाली आहे की यंदाचा महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे. हरिश्चंद्र पाटील यांच्या रूपाने याअगोदर भाजपाला महापौर पद लाभले होते. मात्र सेनेच पारडं पालिकेत जड राहिले आहे. महापौर पदासाठी शिवसेना कायम आग्रही राहिली आहे. आता कल्याण डोंबिवलीच नाही तर एकंदरीतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चव्हाण यांच्यावर अधिक जबाबदारी असणार आहे.
शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर विशेषतः कल्याण डोंबिवली शहरात शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या पहिली वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर दोन्ही पक्ष कितीही एकत्र आहोत हे दाखवत असले तरी त्यांच्यात पडद्याआडूनही धुसफूस सुरू असल्याच्या अनेक चर्चा आहेत. डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. आमदार रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवासही मोठा आहे. स्थानिक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता तर प्रदेशाध्यक्ष पदावर चव्हाण यांची वर्णी लागल्यामुळे त्यांच्याकडून स्थानिक भाजपच्याही अपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. इथून मागे झालेल्या निवडणुकीत शिवसेना ही एक होती.आता पहिल्यांदाच दोन्ही सेना मैदानात उतरणार आहेत. सेनेच्या फुटीचा फायदा भाजपा कशापद्धतीने घेते ते देखील पाहावं लागणार आहे. कारण ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचा महापौर असा फॉर्म्युला ठरला तर जोरदार घमासान होणार!
समजा पालिका निवडणुकीत युती झाली किंवा नाही झाली तर मित्रपक्षाच्या अधिक जागा निवडून येता कामा नये ही राजकीय महत्वकांक्षाही बाळगली जाणार आहे .शिवसेनेचा कल्याण पश्चिमेत दबदबा आहे ..त्या जोरावरच सेनेचा महापौर पालिकेत विराजमान झाल्याची पार्श्वभूमी आहे ..मात्र फुटीनंतर तिथेही मतांचं विभाजन होऊ शकते. गत निवडणुकीत शिवसेनेचे ५३ तर भाजपाचे ४३ नगरसेवक निवडून आले होते ...आता सेनेच्या नगरसेवकांचीही विभागणी झाली आहे.. राज्य पातळीवर कितीही युतीच्या मैत्रीचा
गाजावाजा केला जात असला तरी स्थानिक पातळीवर राजकीय फटाके फुटणार हे नक्की ...एकीकडे शिंदेशाही तर दुसरीकडे चव्हाणांचा कोकणी बाणा या निवडणुकीत विशेषतः ठाणे जिल्ह्यात अनुभवायला मिळणार आहे...
मनसेचे राजू पाटील कोणाला देणार टाळी?
शिंदेंची सेना आणि भाजप एकत्र नांदत असले तरी मनसेचे नेते राजू पाटील यांचीही भूमिका स्थानिक राजकारणात महत्वाची ठरणार आहे .. गत निवडणुकीत मनसेचे ९ नगरसेवक निवडून आले होते.
पालिका निवडणुकीत युती होते की की नाही याबाबत अजूनही शंका व्यक्त होतं आहे ..भाजपाचे नवीन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे राजू पाटील यांचे शेजारी आहे ..दोघांमध्ये मैत्री पण चांगली आहे. त्यामुळे एकीकडे ठाकरे गटाशी जरी मनसेच सूत जुळत असलं तरी पालिका निवडणुकीत राजू पाटील शेजारधर्म पाळतात का हा देखील मोठा ट्विस्ट आहे.