घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 10:55 IST2025-11-08T10:54:54+5:302025-11-08T10:55:37+5:30
डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाई

घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. आठ दिवसांपासून घरात अंघोळीसाठी पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, तर बाकी सगळी कामे कशी होणार? या पाणी टंचाईला कंटाळून एमआयडीसी निवासी भागातील काशीनाथ सोनावणे (वय ७६) या दिव्यांग वयोवृद्धाने इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. अनिल शिंदे या तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वयोवृद्ध वाचला.
डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेले काही दिवस टंचाई आहे. काही इमारतींत गेला आठवडाभर पाण्याचा एकही थेंब आला नसल्याने नागरिकांनी एमआयडीसी कार्यालयात जाऊन जाब विचारला. त्यांच्याकडून थातूरमातूर उत्तरे दिली गेली. एमआयडीसीचे अधिकारी पाणी टंचाईची तक्रार करणाऱ्या नागरिकांना पाइपलाइन बदला, पाइपलाइनची तपासणी करतो, असे सांगत होते.
टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची सहनशीलता संपुष्टात आल्याने सोनावणे यांनी ते राहत असलेल्या गुरुदेव सोसायटीच्या गच्चीवर जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांना अनिल या तरुणाने पाहिले. त्याने त्यांची समजूत काढून खाली आणले.
या घटनेनंतर साेशल मीडियावर जाेरदार चर्चा रंगली. अनेकांनी शासनाच्या कारभारावर टीका केली. शहरातील पाणीटंचाई त्वरित दूर करावी, अशी मागणी या घटनेच्या निमित्ताने कल्याण-डाेंबिवली पालिकेसह पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली.
टँकरमाफियांना पाणी मिळते, आम्हाला का नाही?
आ. मोरे यांनी सांगितले की, पाणी प्रश्नावर शिंदे सेनेचे आ. राजेश मोरे यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेतली. टँकरमाफियांना पाणी मिळते, आम्हाला का मिळत नाही, असा संतप्त सवाल नागरिकांनी आमदारांना विचारला. २७ गावांतील पिसवली, देशमुख होम, गोळवली, दावडी, रिजन्सी या परिसरात महिनाभरापासून पाणीटंचाई आहे. नागरिकांचा रोष वाढत चालल्याने पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. २७ गावांत अमृत योजनेचे काम सुरू आहे. येत्या गुरुवारी पुन्हा पाणीप्रश्नावर आढावा बैठक घेतली जाणार आहे. यावेळी मिलापनगरमधील रहिवाशांनी अधीक्षक अभियंता बी. बी. हर्षे यांना निवेदन सादर केले.