अर्धा डझन गुन्हेगारांकडे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र; गंभीर गुन्ह्यात मिळवला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 07:23 IST2024-12-28T07:14:50+5:302024-12-28T07:23:43+5:30
विशाल गवळीने प्रमाणपत्र कसे मिळवले याची चौकशी करण्याची मागणी

अर्धा डझन गुन्हेगारांकडे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र; गंभीर गुन्ह्यात मिळवला जामीन
कल्याण :कल्याणमधील राजकीय वरदहस्त लाभलेला गुंड विशाल गवळी व अन्य किमान पाच ते सहा गुन्हेगारांनी मानसिक रुग्ण असल्याची प्रमाणपत्रे मिळवली आहेत. त्याद्वारे विनयभंग, छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यात त्यांनी जामीन मिळवला असल्याची धक्कादायक माहिती आहे. गवळीच्या चौकशीत याचा उलगडा झाला. तर ज्यांनी-ज्यांनी अशी प्रमाणपत्रे मिळवली आहेत, त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी पीडित मुली व महिलांनी केली आहे.
एका अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करणारा आराेपी गवळी याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आहे. विशालच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, विशालकडे मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र आहे. त्याने या प्रमाणपत्राच्या आधारेच या आधी जामीन मिळवला. विशालने यापूर्वी कल्याण पूर्वेतील काही मुली व महिलांशी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. परंतु, राजकीय पक्षाच्या नेत्यांचे आशीर्वाद व मानसिक रुग्ण असल्याचे मिळवलेले बनावट प्रमाणपत्र यामुळे तो तुरुंगाच्या बाहेर येऊन पुन्हा तेच उद्योग करीत होता.
... तर बचाव करणे अशक्य
वकील महेश शिवदास यांनी सांगितले की, न्यायालय संबंधित आरोपी मानसिक रुग्ण आहे की नाही, याची चौकशी करते. संबंधित आरोपीला सरकारी रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञांकडे पाठवून त्यांचे मत विचारात घेतले जाते.
एखाद्या गुन्हेगारावर कोणत्या गुन्ह्याकरिता खटला सुरू आहे, याचे गांभीर्य त्याला कळले आहे की, नाही हे न्यायालय तपासून पाहते. एखाद्या गुन्हेगाराने आपण मनोरुग्ण असल्याचा दावा केला, तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून त्याची तपासणी केली जाते.
त्यानंतर त्याच्यावर कसा खटला चालवायचा, याचा निर्णय होतो. गवळीच्या प्रकरणात त्याने एकदा गुन्हा केला व तो जामिनावर सुटला. मात्र, आता त्याने पुन्हा तसाच किंवा त्यापेक्षा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केल्याने पुन्हा तो मनोरुग्ण असल्याचे सांगून बचाव करू शकत नाही.
आरोपी विशाल गवळीची वैद्यकीय तपासणी
आरोपी विशाल गवळीला उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता आणणार असल्याने रुग्णालयाबाहेर सकाळी ११ वाजल्यापासून पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
दुपारी तीन वाजता त्याला रुग्णालयात आणले. दोन तासांच्या तपासणीनंतर त्याला पुन्हा कल्याणला कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सुरक्षेच्या कारणांमुळे आरोपी विशाल गवळीला वैद्यकीय तपासणीकरिता कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेणे पोलिसांनी टाळले.
उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयाने दिलेल्या अहवालानुसार, विशाल गवळी हा मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे सांगण्यात आले आहे.
महापालिकेच्या रुग्णालयात अशा प्रकारचे मासनिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र दिले गेलेले नाही. याची शहानिशा आम्ही केली. हे प्रमाणपत्र खासगी मानसपचोर तज्ज्ञांकडून दिले गेले असावे.
- डॉ. दीपा शुक्ल, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.
मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार महापालिका रुग्णालयांना आणि सिव्हील सर्जनला आहे. संबंधित आरोपीकडे कोणते प्रमाणपत्र आहे, हे पाहावे लागले. त्यावर कोणाची सही शिक्के आहेत. त्याने खोटे प्रमापत्रही मिळवले असावे. पोलिसांनी त्याचा तपास करावा.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.
मानसिक रुग्ण असल्याचे प्रमाणपत्र हे सरकारी रुग्णालयात मिळते, तसेच ते खासगी डॉक्टरही देऊ शकतो. सगळ्या चाचण्या केल्यावर एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्यावर तसा दाखला दिला जातो.
- डॉ. अद्वैत पाध्ये, मानसोपचारतज्ज्ञ.