अर्णवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा; या प्रकरणात राजकारण करू नका - श्रीकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 08:35 IST2025-11-24T08:34:47+5:302025-11-24T08:35:10+5:30
१८ नोव्हेंबरला मुलुंड येथे लोकलने जात असताना मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी अर्णवला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता.

अर्णवला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा; या प्रकरणात राजकारण करू नका - श्रीकांत शिंदे
कल्याण : अर्णव खैरे (वय १९) आत्महत्या प्रकरणात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याच्या तपासकामी कोळसेवाडी पोलिसांची दोन पथके स्थापन करण्यात आली असून लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दलाकडूनही तपास सुरू आहे.
१८ नोव्हेंबरला मुलुंड येथे लोकलने जात असताना मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून अज्ञात व्यक्तींनी अर्णवला मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या मानसिक तणावातून अर्णवने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे वडील जितेंद्र यांनी केला आहे. दरम्यान, अर्णवच्या आत्महत्येवरून मराठी-अमराठी वाद पुन्हा पेटला असून सत्ताधारी भाजपकडून अर्णवच्या आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी होत असताना उद्धवसेना आणि मनसेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टिका केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदेसेनेचे खा. डॉ श्रीकांत शिंदे यांनी अर्णवच्या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया देऊन अप्रत्यक्षपणे भाजपला सुनावल्याची चर्चा शहरात आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, परंतु वडील जितेंद्र यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञातांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा रीतसर गुन्हा दाखल केला आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांकडून काही जणांची चौकशीदेखील सुरू करण्यात आली असून कल्याण ते मुलुंड रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातूनही तपास केला जाणार आहे. त्यादृष्टीने पोलीसांनी कंबर कसली आहे.