Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण असलेल्या 'त्या' रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 21:03 IST2021-12-08T20:53:46+5:302021-12-08T21:03:10+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: रुग्णाचा आजच वाढदिवस असल्याने हा रुग्ण बरा होऊन घरी गेला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Omicron Variant : मोठा दिलासा! ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण असलेल्या 'त्या' रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटीव्ह
कल्याण - साऊथ आफ्रिकेच्या केपटाईन शहरातून डोंबिवलीत आलेल्या त्या 32 वर्षीय रुग्णाला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याची पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने या रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. देशातील पहिली केस जी बरी होऊन घरी गेली आहे. या रुग्णाचा आजच वाढदिवस असल्याने हा रुग्ण बरा होऊन घरी गेला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
केपटाऊनहून हा रुग्ण दुबई, दिल्ली ते मुंबई असा प्रवास करुन डोंबिवलीत दाखल झाला होता. 26 तारखेला तो मुंबईहून डोंबिवलीत प्रवास करुन आला होता. त्याला ताप आल्याने त्याने स्वत: जाऊन डॉक्टरकडे तपासणी केली. टेस्ट केली असता त्याची कोरोना टस्ट पॉझीटीव्ह आली होती. महापालिकेने त्याची गंभीर दखल घेत त्याला महापालिकेच्या कोविड रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवले. त्याचे नमुने जीनोम सिक्वेसिंगकरीता एनआयव्हीला पाठविले होते. त्याचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला होता. राज्यातील हा पहिला ओमायक्रॉनचा रुग्ण होता. त्यामुळे कल्याण डोंबिवलीसह राज्याची धास्ती वाढली होती. या रुग्णाला कोणतेही लक्षणो आढळून आली नव्हती. त्याची प्रकृती स्थिर होती.
रिपोर्ट आल्यानंतर त्याची महापालिकेने पुन्हा कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली. त्याचा रिपार्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाचा जीव भांडय़ात पडला आहे. रुग्णाचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. मात्र त्याला आणखीन सात दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. रुग्णाचा आज वाढदिवस असल्याने त्याची आयुक्तांनी फोनवरुन विचारपूस करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ही बाब महापालिकेसह देशासाठी समाधानकारक आणि दिलासा देणारी असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.