डोंबिवलीत साफसफाईवरून पेटला वाद; शेजाऱ्याच्या अंगावर सोडला पाळीव कुत्रा, दोन जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:29 IST2026-03-24T17:28:29+5:302026-03-24T17:29:47+5:30
Dombivli News: लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबरची साफसफाई करण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरात भांडण झाले.

डोंबिवलीत साफसफाईवरून पेटला वाद; शेजाऱ्याच्या अंगावर सोडला पाळीव कुत्रा, दोन जण जखमी
डोंबिवली: लोढा हेवन या हायप्रोफाईल सोसायटीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चेंबरची साफसफाई करण्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरात भांडण झाले. यादरम्यान एका शेजाऱ्याने दुसरा शेजारी कुटुंबाच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडला. या पाळीव कुत्र्याने दोन जणांचा चावा घेतला. दोघे जखमी झाले. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
लोढा हेवन या सोसायटीत योगी कुटुंबातील काही लोक घराच्या मागे असलेल्या चेंबरची दोन कामगारांच्या मदतीने साफसफाई करीत होते. याच दरम्यान शेजारी राहणाऱ्या तिवारी कुटुंबातील अनुराधा तिवारी, संतोष तिवारी, आणि कृतिका तिवारी या ठिकाणी आले. चेंबरची सफाई का करता ? या कारणावरून तिघांनी योगी नामक कुटुंबीयांसोबत वाद घातला. तिघांनी योगी कुटुंबातील तिघांना मारहाण केली. या दरम्यान तिवारी कुटुंबीयांनी आपल्या पाळीव कुत्रा योगी कुटुंबाच्या अंगावर सोडला.
साफसफाई करणारे दोघे कामगार पळून गेले .या पाळीव कुत्र्याने मनोज योगी आणि त्यांचा मुलाचा चावा घेतला. कुत्र्याने चावा घेतल्याने दोघे जखमी झाले. मनोज योगी यांच्यावर हॉस्पिटलमध्ये तीन दिवस उपचार झाले. या प्रकरणात योगी कुटुंबाच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी तिवारी कुटुंबातील संतोष तिवारी, अनुराधा तिवारी आणि कृतिका तिवारी या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.