मराठीच्या मुद्द्यावरून तीन सेनांमध्ये रस्सीखेच; राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 05:51 IST2024-12-21T05:50:40+5:302024-12-21T05:51:21+5:30

कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमधील राड्यानंतर मराठी-अमराठीचा हा मुद्दा आपल्या हातातून सुटेल, या भीतीपोटी शिंदेसेना, उद्धवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्या.

competition between three armies over marathi issue after kalyan high profile case and action taken as political parties become aggressive | मराठीच्या मुद्द्यावरून तीन सेनांमध्ये रस्सीखेच; राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने कारवाई

मराठीच्या मुद्द्यावरून तीन सेनांमध्ये रस्सीखेच; राजकीय पक्ष आक्रमक झाल्याने कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: कल्याणमधील हायप्रोफाईल सोसायटीमधील राड्यातील आरोपी अखिलेश शुक्ला याच्या अटकेच्या मागणीकरिता तीन सेना मैदानात उतरल्यामुळे शुक्लावर कारवाई करणे पोलिसांना भाग पडले.  सरकारी अधिकारी असलेल्या शुक्लाला वाचवण्याकरिता पोलिसांवर दबाव होता. मात्र, मराठी-अमराठीचा हा मुद्दा आपल्या हातातून सुटेल, या भीतीपोटी शिंदेसेना, उद्धवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाल्याने पोलिसांनी शुक्लाच्या मुसक्या आवळल्या. 

सनी पवार यांची कल्याणमध्ये धाव

आयटी इंजिनीअर असलेले व ३० वर्षे अमेरिकेत वास्तव्यास असलेले सनी पवार हे सुट्टीनिमित्त मुंबईत अंधेरी येथे आले आहेत. कल्याणमधील तरुणावर झालेल्या हल्ल्याची घटना ऐकून त्यांनी शुक्रवारी कल्याणमध्ये धाव घेतली. 

पवार म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी माणसाची हालत काय आहे, हे या घटनेवरून उघड होते. परप्रांतीयांना महाराष्ट्राने नोकरी दिली. त्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले पाहिजेत. तेच परप्रांतीय मराठी माणसाच्या जिवावर उठले आहेत. 

शुक्ला परिवाराच्या पाठीशी उभे राहिलेले आरोपी उद्धवसेनेशी संबंधित आहेत.  विधानसभा निवडणुकीत त्यांनी उद्धवसेनेचेे काम केले होते. विधानसभा निवडणुकीत  मनसेलाही पराभव पचवता आला नाही. महाराष्ट्र पेटविण्यासाठी मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याला तत्काळ अटक करावी. - अरविंद मोरे, जिल्हाध्यक्ष, शिंदेसेना.

या प्रकरणामुळे मराठी माणूस भडकला तर इथे राहणाऱ्या परप्रांतीयांना धोका होऊ शकतो, हे पोलिस प्रशासनाला माहीत नाही का? शुक्लाला तत्काळ अटक करून त्याच्या विरोधात कलम १०९ लावा, अन्यथा उद्धवसेनेकडून जनआंदोलन केले जाईल. आरोपी कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी त्यांना अटक झालीच पाहिजे.- विजय साळवी, उपनेते, उद्धवसेना.

मराठी कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना गंभीर आहे. यात राजकारण करता कामा नये. मात्र, प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला याला पोलिसांनी तत्काळ अटक करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. - विश्वनाथ भोईर, आमदार, शिंदेसेना.

मराठी तरुण अभिजित देशमुख याच्यावर अखिलेश शुक्लाने भ्याड हल्ला केला. शुक्लाला अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी मनसेने पोलिसांची भेट घेतली होती. पोलिसांनी शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली आहे. प्रमुख आराेपी शुक्ला याच्यावर कठोर कारवाई झाली नाही, तर आज योगीधाम परिसरात बंद पुकारण्यात येईल. - उल्हास भोईर, जिल्हाध्यक्ष, मनसे.

 

Web Title: competition between three armies over marathi issue after kalyan high profile case and action taken as political parties become aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.