मनसे शहराध्यक्षांवर ४ कोटी ११ लाखाची फसवणूक केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:07 IST2022-03-19T19:07:03+5:302022-03-19T19:07:43+5:30
महत्मा फुले पोलीस ठाण्यात गणेश म्हात्रे यांची केलेल्या तक्रारीनुसार, गौरीपाडा येथे वडिलोपार्जित २० गुंठे जागा विकसीत करण्यासाठी कौस्तूभ देसाई यांच्यासोबत करार करण्यात आला होता.

मनसे शहराध्यक्षांवर ४ कोटी ११ लाखाची फसवणूक केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
कल्याण- खोट्या सहीच्या आधारे बँकेतून ४ कोटी ११ लाख रुपये काढून पार्टनरची फसवणूक केल्याप्रकरणी मनसे शहराध्यक्ष कौस्तूभ देसाई व त्यांचे भाऊ कल्पेश देशाई या दोघांविरोधात कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्मा फुले पोलीस ठाण्यात गणेश म्हात्रे यांची केलेल्या तक्रारीनुसार, गौरीपाडा येथे वडिलोपार्जित २० गुंठे जागा विकसीत करण्यासाठी कौस्तूभ देसाई यांच्यासोबत करार करण्यात आला होता. ड्रीमहोम्स या संस्थेच्या नावाखाली हा करार केला होता. पैशाच्या व्यवहारासाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यासाठी म्हात्रे यांच्याकडून सर्व कागदपत्रे घेतली गेली. नंतर कौस्तूभ देसाई यांनी सांगितले की, ही बँक बरोबर सेवा देत नाही. म्हणून जीपी पारसिक बँकेत खाते उघडले गेले.
दरम्यान म्हात्रे यांनी ऑडीट केले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांची ४ कोटी ११ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही फसवणूक कौस्तूभ व त्यांचा भाऊ कल्पेश देसाई यांनी केली आहे. एचडीएफसी बँकेत खाते उघडले होते. ते उघडले गेले नाही, असे म्हात्रे यांना खोटे सांगण्यात आले होते. मात्र फ्लॅट धारकांनी या बँकेत जे पैसे जमा केले होते. ते ४ कोटी ११ लाख रुपये खोट्या सहीच्या आधारे कौस्तूभ व कल्पेश् देसाई यांनी काढून म्हात्रे यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कौस्तूऊ व कल्पेश देसाई यांच्या विरोधात फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कौस्तूभ देसाई यांचे म्हणणे आहे की, मी पार्टनरला सर्व पैसे दिले आहे. त्यांना आणखीन पैशाची लालूच आहे. पैशासाठी माझ्याविरोधात खोटानाटा आरोप करून गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपासात सर्व काही उघड होईल.