उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: October 4, 2025 21:33 IST2025-10-04T21:31:01+5:302025-10-04T21:33:34+5:30
रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या खात्यात वळती करून शासनाची फसवणूक व महसूल उत्पन्नाची हानी

उल्हासनगरातील व्यापाऱ्याने जीएसटीच्या माध्यमातून घातला १ कोटी ८५ लाखांचा गंडा; गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : स्प्लॅश ट्रेडर्स या कंपनीची स्थापना नरेश आठवले यांनी करून खोटी कागदपत्रे व खोटी माहितीच्या आधारे जीएसटी परताव्या माध्यमातून शासनाला १ कोटी ८५ लाख ८८ हजार ८५१ रुपयाला गंडा घातल्याचे उघड झाले. राज्य कर निरीक्षक अनिल नारायण चव्हाण यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर कॅम्प नं-३, पंजाबी कॉलनी परिसरात राहणारे नरेश याकूब आठवले यांनी साथीदारांच्या मदतीने सन-२०१९ मध्ये मे. स्प्लॅश ट्रेडर्स या फर्मची खोटी कागदपत्रे बनवून व शासनास खोटी माहीती सादर करून स्थापना केली. त्यानंतर कंपणी नोंदणी दाखला मिळविला. आठवलेसह अन्य साथीदारांनी स्वत:चा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी खोटा व चुकीचा कर परतावा मिळवा. यासाठी बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून जीएसटी कार्यालयाकडून नोंदणी दाखला मिळविला. वस्तू व सेवाकर कार्यालय, मुंबई यांचेकडून मे. स्प्लॅश ट्रेडर्स या व्यापाराचा एकुण १ कोटी ८५ लाख ८८ हजार ८५१ रुपयाचा परतावा मंजुर केला. सदरची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या खात्यात वळती करून शासनाची फसवणूक व महसूल उत्पन्नाची हानी केली. तब्बल ५ वर्षानंतर शासनाला राज्य कर महसूलात हानी झाल्याचा प्रकार विभागाच्या लक्षात आला.
राज्य करनिरीक्षक अनिल नारायण चव्हाण यांनी शासनाला १ कोटी ८५ लाखाला नरेश आठवले यांच्यासह अन्य व्यापाऱ्यानी जीएसटीच्या माध्यमातून गंडा घातला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केली. मध्यवर्ती पोलिसांनी तक्रारीवरून नरेश आठवले यांच्यासह अन्य साथीदारावर गुन्हा दाखल केला. थेट शासनाला गंडा घालण्याचा प्रकार उघड झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास मोठे घबाळ उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.