उल्हासनगरात भाजपा नेत्यांची टिपण्णी शिंदेसेनेच्या जिव्हारी
By सदानंद नाईक | Updated: November 25, 2025 17:48 IST2025-11-25T17:45:31+5:302025-11-25T17:48:24+5:30
पोलीस उपायुक्ताची भेट घेत शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने केली कारवाईची मागणी

उल्हासनगरात भाजपा नेत्यांची टिपण्णी शिंदेसेनेच्या जिव्हारी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : कलानी व शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांची गुंडागिरी मोडीत काढू. विठ्ठलवाडी रिक्षा स्टॅन्ड परिसराचा सात बारा काढला का? असा इशारा कार्यकारणी बैठकीत भाजपाचे निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी दिला. हा इशारा शिंदेसेनेच्या जिव्हारी लागून त्यांनी मंगळवारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन, कार्यकर्त्याच्या मारहाणीची चौकशीची मागणी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-३, विठ्ठलवाडी रेल्वे रिक्षा स्टॅन्डवर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांचे नाव घेऊन, जाधव नावाच्या पक्ष कार्यकर्त्याने एका रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. तसेच त्याच रात्री माजी नगरसेविका शुभांगी बहेनवाल यांच्या घरासमोर पंचशीलनगर मध्ये काहीजणांनी धुडगूस घालून हाणामारी केल्याची घटना घडली होती. मनोहर बहेनवाल यांच्या तक्रारीवरून ८ पेक्षा जास्त जणावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बहेनवाल ह्या शिंदेसेनेच्या माजी नगरसेविका असून त्यांनी काही दिवसापूर्वी भाजपात प्रवेश केला. यावरूनच चौधरी व बहेनवाल यांच्या मध्ये वितुष्ट आले. याच मारहाणीवरून भाजपाचे उल्हासनगर निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांनी कलानी व चौधरी यांची गुंडागिरी मोडून काढण्याचा इशारा पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत सोमवारी रात्री दिला होता.
भाजपचे निवडणूक प्रमुख प्रदीप रामचंदानी यांचे गुंडागिरी मोडून काढू ही टिका शिंदेसेनेच्या जिव्हारी लागली. शिंदेसेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी दुपारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेऊन, माजी नगरसेविका शुभांगी बहेनवाल यांच्या घरा समोर झालेल्या मारहाणीची चौकशी करण्याची मागणी केली. बहेनवाल यांच्या तक्रारीवरून ज्यांच्यावर गुन्हा नोंदवीला आहे. त्यापैकी ऐकजण भाजपाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप शिंदेसेनेचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. शिंदेसेनेच्या शिष्टमंडळात महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख अरुण अशांन, शहरप्रमुख राजेंद्रसिंग भुल्लर आदी जणांचा समावेश होता.