मोठा अनर्थ टळला! डोंबिवलीतील पेट्रोल पंपास आग, अग्निशमन दलाने घेतली धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 17:01 IST2021-10-16T16:57:09+5:302021-10-16T17:01:37+5:30
Fire broke out at Petrol Pump : माजी नगरसेवकाने केली कारवाईची मागणी

मोठा अनर्थ टळला! डोंबिवलीतील पेट्रोल पंपास आग, अग्निशमन दलाने घेतली धाव
कल्याण - डोंबिवली पश्चिम भागातील राजूनगर येथील पेट्रोल पंपावर सॅम्पल बकेट घेत असताना आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. यावेळी तातडीने अग्नीशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दलाने वेळीच आग नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
राजूनगर येथील पेट्रोल पंपावर आज दुपारी आग लागताच पंपाच्या ठिकाणाहून काळ्य़ा धुराचे लोट बाहेर येऊ लागले. हे लोट पाहून नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली. हा पेट्रोल पंप भर वस्तीत आहे. तसेच या ठिकाणी पंपाच्या शेजारीच महापालिकेची शाळाही आहे. या ठिकाणचे भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी सांगितले की, पेट्रोल पंपाला गेल्या सहा महिन्यात दोन वेळा आग लागली आहे. हा पंप भरवस्तीत आहे. या पंपाला भरवस्तीत परवानगी दिली कोणी आणि कशाच्या आधारे असा सवाल उपस्थित केला आहे. वेळीच आग विझली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. आगी प्रकरणी पंप चालकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.