...आणि तो झाला गांजा तस्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 09:54 IST2025-01-22T09:53:12+5:302025-01-22T09:54:13+5:30
Kalyan News: ‘त्याने’ हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर कॅफे सुरू केले. सगळे सुरळीत सुरू असताना मित्रांच्या नादाला लागून तो नशेखोर झाला. त्यामुळे त्याला सर्व काही गमावण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला.

...आणि तो झाला गांजा तस्कर
कल्याण - ‘त्याने’ हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर कॅफे सुरू केले. सगळे सुरळीत सुरू असताना मित्रांच्या नादाला लागून तो नशेखोर झाला. त्यामुळे त्याला सर्व काही गमावण्याची वेळ आली. तो कर्जबाजारी झाला. मग त्याने सुरू केली गांजाची तस्करी. ती करताना तो रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याचे नाव भावेश गायकवाड आहे. तो उच्चभ्रू कुटुंबातील आहे.
भुवनेश्वर एक्स्प्रेसने भावेश प्रवास करत होता. गाडी अंबरनाथजवळ आली तेव्हा गाडीतील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना संशय आला. त्यांनी त्याला हटकले. मात्र, उत्तर देताना तो अडखळला. जवानांनी त्याच्या बॅगेची तपासणी केली असता पिशवीत गांजा सापडला. कल्याण रेल्वे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
भावेश उच्चभ्रू कुटुंबातील मुलगा
भावेश हा रायगड जिल्ह्यात राहतो. तो उच्चभ्रू कुुटुंबातील आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केल्यानंतर पनवेल येथे मोठा कॅफे सुरू केला. मात्र, चांगले सुरू असताना मित्रांसोबत त्याला नशेचे व्यसन लागले. या व्यसनामुळे त्याचा कॅफे बंद पडला.
घरातील दागिने आणि काही किमती वस्तू विकण्याची वेळ त्याच्यावर आली. तो कर्जबाजारी झाला. आता करायचे काय तर त्याने गांजाची तस्करी सुरू केली. हा गांजा तो कोणासाठी आणि कुठे घेऊन जात होता? याचा तपास आता कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.