चोरी, बलात्कार, खुनापर्यंत सर्व गुन्हे विशालवर दाखल; पोलिस उपायुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 10:00 IST2024-12-29T09:57:23+5:302024-12-29T10:00:06+5:30
कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, २०१४ सालापासून विशाल याच्या विरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

चोरी, बलात्कार, खुनापर्यंत सर्व गुन्हे विशालवर दाखल; पोलिस उपायुक्तांची माहिती
कल्याण : आरोपी विशाल गवळी याच्यावर गेल्या १० वर्षांपासून विविध गंभीर गुन्हे असल्याची माहिती उघड झाली. चोरी, विनयभंग, प्राणघातक हल्ला आणि आता बलात्कार व हत्या, अशा चढत्या भाजणीची विशालची गुन्हेगारी कारकीर्द आहे.
कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले की, २०१४ सालापासून विशाल याच्या विरोधात आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, एका मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, चोरी, एकावर प्राणघातक हल्ला, दोन वेळा तडीपारीच्या आदेशाचा भंग आणि आता अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा गुन्हा दाखल आहे.
प्रत्येक गुन्ह्यात त्याने मिळविलेला जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली आहे. किती आरोपींना मानसिक रुग्णाचा दाखला देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी, ठाणे सिव्हिल, मनोरुग्णालय आणि मुंबईतील रुग्णालयांना पत्र देऊन पोलिस माहिती घेणार आहेत.
शिवसेनेकडून पाच लाखांची मदत
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने पीडित मुलीच्या कुुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्यात आली.
- ही मदत खासदारांचे स्वीय साहाय्यक अभिजित दरेकर, शिवसेना शहरप्रमुख नीलेश शिंदे आणि मल्लेश शेट्टी यांनी मुलीच्या वडिलांकडे सुपूर्द केली.
वनमंत्री गणेश नाईक यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची घेतली भेट
- वनमंत्री गणेश नाईक यांनी शनिवारी सायंकाळी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
- कुटुंबीयांच्या मनात भीती आहे. आम्ही त्यांना सांगितले की, चिंता करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. आरोपीला योग्य धडा शिकविला जाईल.
- आरोपीने मनोरुग्ण असल्याचा घेतलेला दाखला चुकीच्या पद्धतीने मिळविला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी मी करणार आहे.
- हा दाखला देणारे कोण आहेत याचा शोध घेतला जाईल, असे नाईक म्हणाले.