डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला, तीघेजण अडकले

By प्रशांत माने | Published: September 15, 2023 09:28 PM2023-09-15T21:28:48+5:302023-09-15T21:30:03+5:30

एकाला गंभीर अवस्थेत बाहेर काढले, बचावकार्य सुरू

A section of a dangerous building collapsed in Dombivli. | डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला, तीघेजण अडकले

डोंबिवलीत अतिधोकादायक इमारतीचा भाग कोसळला, तीघेजण अडकले

googlenewsNext

डोंबिवली: येथील पूर्वेकडील आयरे रोड लक्ष्मणरेषा परिसरातील आदिनारायण भुवन या अतिधोकादायक इमारतीचा भाग शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोसळला. यात तीघेजण ढिगा-याखाली अडकले. केडीएमसीचे अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांच्याकडून बचावकार्य सुरू होते. रात्री आठच्या सुमारास तिघांपैकी एकाला गंभीर अवस्थेत बाहेर काढले. उर्वरीत दोघांचा शोध सुरू आहे. लोडबेरींग प्रकारातील इमारत मनपाकडून अतिधोकादायक जाहीर केली गेली होती. विशेष बाब म्हणजे इमारत खाली करताना मनपा अधिकारी कर्मचा-यांच्या पथकासमोरच इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली.

एल टाईप आकाराच्या या तळमजला अधिक तीन मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर दहा अशा ४० खोल्या आहेत. इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर केल्याने येथील बहुतांश कुटुंबांनी इथली जागा सोडून ते इतरत्र राहायला गेले होते. परंतू पाच ते सहा कुटुंब याठिकाणी वास्तव्याला होती. गुरूवारपासूनच या इमारतीचा काही भाग कोसळत होता. मनपाच्या पथकांना ही माहीती मिळताच तेव्हापासूनच घर रिकामी करण्याबाबत अधिका-यांकडून प्रयत्न सुरू होते परंतू रहिवासी घरातून बाहेर पडायला तयार नव्हते.

शुक्रवारी देखील पथकातले अधिकारी रहिवाशांना जबरदस्तीने बाहेर काढायला आले असता काही कुटुंब घराबाहेर पडली. परंतू दिप्ती लोढीया (वय ४५) आणि अरविंद लोढीया (वय ७०) हे दोघे आजारी तसेच बेडवर उपचार घेत असल्याने ते बाहेर पडू शकले नाही. इमारतीचा तीन मजली भाग कोसळताच त्याखाली हे दोघेच अडकल्याची माहीती मिळाली परंतू खोदकामात अन्य एका अनोळखी व्यक्तिला ढिगा-याखालून बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेत बाहेर काढलेले दिप्ती लोढीया यांचे पती सुनिल लोढीया असल्याची माहीती उपस्थितांकडून दिली गेली. दरम्यान त्यांना तत्काळ खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. दरम्यान इतर दोघांचे शोधकार्य सुरू होते.

या घटनेतील गंभीर अवस्थेतील सुनील लोढीया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर त्यांची पत्नी दिप्ती लोढीया यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. त्यांना आता रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर ढिगा-याखाली अडकलेल्या अरविंद भाटकर यांचा शोध सुरु आहे.

दैव बलवत्तर म्हणून ते बचावले

याच इमारतीलगत एक चाळ आहे. या चाळीतील रहिवाशांना देखील खोल्या रिकाम्या करण्याच्या नोटीसा बजावल्या गेल्या होत्या. इमारतीला लागूनच असलेल्या चाळीच्या खोलीत शोएब मलिक हा तरूण आपल्या दोन मित्रांसह राहत होता. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शोएब मित्रांसोबत घराबाहेर पडला आणि अवघ्या काही मिनिटातच ही इमारत कोसळली. पुन्हा तो घराच्या दिशेने परतला असता घरावर कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पाहून तो थक्क झाला. शोएब आणि त्याचे मित्र काही मिनिटांपूर्वीच घराबाहेर पडल्याने त्यांचा जीव वाचला.

पत्नी आणि मुलगा रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडले पण...

ढिगा-याखाली अडकलेले ७० वर्षीय अरविंद भाटकर हे आजारी असल्याने घरीच बेडवर झोपले होते तर त्यांची पत्नी आणि मुलगा रूम शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. तेवढयात ही इमारत कोसळली. घराबाहेर पडल्याने सुदैवाने दोघांचा जीव वाचला पण अरविंद हे मात्र आजारी असल्याने घराबाहेर पडू शकले नाही.

काही अंतरावर असतानाच इमारतीचा भाग कोसळला, अधिकारी बचावले

ग प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख या सहा ते सात कर्मचा-यांच्या पथकासह इमारत खाली करण्यासाठी गेले होते. त्यांनी इमारतीमधील बहुतांश रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर भाटकर आणि लोढाया हे आजारी असल्याने ते घराबाहेर पडले नाही. दरम्यान अधिकारी इमारतीबाहेर येऊन काही अंतरावर आले असता इमारत पत्त्यासारखी कोसळली. डोळ्यासमोर घडलेल्या घटनेमुळे अधिकारी वर्ग देखील सुन्न झाला होता. दैव बलवत्तर म्हणून त्यांचेही जीव वाचले.

अधिका-यांसह राजकीय मंडळींनी घेतली धाव

मनपा आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांच्यासह आमदार राजू पाटील, दिपेश म्हात्रे, राजेश मोरे, राजेश कदम, विश्वनाथ राणे, संतोष केणे आदि राजकीय पक्षातील पदाधिकार्यांनी धाव घेतली होती.

Web Title: A section of a dangerous building collapsed in Dombivli.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.