दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:22 IST2025-05-21T15:22:42+5:302025-05-21T15:22:53+5:30
सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दु:खाचा डोंगर...; आई, आजी गेल्याचे मुलीला कसे सांगू...? निलंचर साहू जमिनीवरच कोसळले
कल्याण : सप्तशृंगी या धोकादायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर वास्तव्य करणारे निलंचर साहू हे मंगळवारी कामावर निघून गेले. दुपारी इमारतीचा स्लॅब कोसळून त्यांची पत्नी सुनीता साहू, सासू प्रमिला साहू, मेहुणी सुजाता पाडी यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी श्रद्धा जखमी असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही बातमी कळल्यावर कार्यालय सोडून धावतपळत रुग्णालय गाठलेले निलंचर हे जमिनीवर कोसळले. धाय मोकलून रडू लागले. कामावर गेलो म्हणून आपण वाचलो, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर साहू हे कुटुंबासह राहतात. कालच त्यांची सासू, मेहुणी त्यांच्या घरी आली होती. सकाळी निलंचर कामावर निघून गेले. दुपारच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेत त्यांची पत्नी, सासू, मेहुणी यांचा मृत्यू झाला. निलंचर म्हणाले की, मी कामावर गेलो म्हणून बचावलो. मात्र, माझी पत्नी, सासू आणि मेहुणी या तिघांचा मृत्यू झाला. माझी मुलगी बचावली असली तरी तिच्या डोक्यावरील मातेचे छत्र हरपले. एकाचवेळी कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू ही आमच्यावरील मोठी आपत्ती आहे. असे काही होईल हे मला स्वप्नातदेखील वाटले नव्हते. मला हे कळले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. माझ्या मुलीला मी कोणत्या तोंडाने सांगू की, तिची आई, मावशी आणि आजी या जगात राहिली नाही, असे सांगताना निलंचर यांना हुंदका आवरला नाही.
अग्निशमन दलाचे जवान हे एकामागून एक मृतदेह इमारतीच्या बाहेर काढत होते. तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी यांनी एकच टाहो फाेडला. मृत आणि जखमींमध्ये आपल्या घरातील कोणी नाही ना?, याची खातरजमा करण्याकरिता रहिवासी धडपडत होते. शेजारील इमारतीमधील रहिवासी शोकाकुल नातलगांना सांभाळत होते.