दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:38 IST2023-10-11T14:37:59+5:302023-10-11T14:38:32+5:30
याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.

दारूच्या नशेत चार्जरने घोटला मित्राचा गळा
कल्याण : दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच झोपेत असलेल्या मित्राची चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात घडली. अनिल यादव असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे.
खडेगोळवलीत अनिल यादव आणि त्याचा मित्र हिरालाल निषाद एका चप्पलच्या कारखान्यात काम करतात. या कारखान्याच्या गोडाऊनमध्ये हे दोघे सहकाऱ्यासोबत राहतात. सोमवारी रात्री अनिल यादव, हिरालाल निषाद हे दोघे दारू प्यायल्यानंतर त्यांच्यात वाद झाला हाेता.
आराेपीला अटक
- वाद झाल्यानंतर अनिलने हिरालालच्या तोंडावर पाणी फेकले. त्यामुळे संतापलेल्या हिरालाल याने अनिलला धमकी दिली. रात्रीच्या सुमारास अनिल गोडाऊनमध्ये झोपला असताना हिरालाल याने मोबाइल चार्जरच्या वायरने अनिलचा गळा आवळून त्याची हत्या केली.
- दरम्यान, नेहमी प्रमाणे सकाळी कामगार आले असता त्यांना अनिलचा मृतदेह निदर्शनास आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या हत्येप्रकरणी हिरालाल निषाद याला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत, अशी माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली.