डोंबिवलीत अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By अनिकेत घमंडी | Updated: September 3, 2023 16:56 IST2023-09-03T16:56:09+5:302023-09-03T16:56:53+5:30
आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली.

डोंबिवलीत अभियंत्याला मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोंबिवली: महावितरणच्या खडवली शाखा कार्यालयात घुसून कनिष्ठ अभियंत्याला जबर मारहाण व दमदाटी करणाऱ्या दोघांविरुद्ध कल्याण तालुका पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाणीसह भादंविच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी परस्परांचे चुलत भाऊ असून दोन वीजजोडण्याची थकबाकी न भरता नवीन कनेक्शनसाठी त्यांनी मारहाण केली.
भानुदास दशरथ घरत आणि रोहित राम घरत (दोघेही राहणार नडगाव, कुंभारपाडा, खडवली) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे आणि कर्मचारी खडवली शाखा कार्यालयात काम करत असतांना शनिवारी आरोपी कार्यालयात आले. नवीन वीजजोडणी का देत नाही, अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ सुरू केली.
आरोपींच्या कुटुंबियांच्या नावाने गावातील किराणा दुकान आणि कृषिपंप वीजजोडण्यांची थकबाकी असल्याने नवीन कनेक्शन देता येत नसल्याची माहिती अभियंता म्हात्रे यांनी दिली. यावर आरोपींनी अभियंता म्हात्रे यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कार्यालयातील खुर्चीची मोडतोड केली. अभियंता म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर या गुन्ह्याचा तपास करत आहेत.