गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 08:41 IST2025-10-07T08:40:44+5:302025-10-07T08:41:19+5:30
सर्पदंशामुळे ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर यांचा मृत्यू झाला. प्राणवीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर २ दिवसांच्या उपचारानंतर श्रृती ठाकूर हिचाही जीव गेला

गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
कल्याण - २८ सप्टेंबरला डोंबिवलीतील खंबाळपाड्यात धक्कादायक घटना समोर आली. याठिकाणी ४ वर्षीय चिमुकलीसह तिच्या मावशीला रात्री गाढ झोपेत असताना सर्पदंश झाला. मण्यार जातीचा साप चावल्याने या दोघींना प्राण गमवावे लागले आहेत. ४ वर्षीय मुलीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर तिच्या मावशीवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारावेळी तिचाही जीव गेला. या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी शास्त्रीनगर रुग्णालयाचे डॉ. संजय जाधव यांचं निलंबन केले आहे.
सर्पदंशामुळे ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर यांचा मृत्यू झाला. प्राणवीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर २ दिवसांच्या उपचारानंतर श्रृती ठाकूर हिचाही जीव गेला. या घटनेत डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळे दोघींचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. नातेवाईकांच्या आरोपानंतर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला होता. ३ ऑक्टोबरला हा खुलासा सादर करण्यात आला. ज्यादिवशी ही घटना घडली तेव्हा डॉ. संजय जाधव वैद्यकीय अधिकारी यांची रात्रपाळी होती. परंतु ते रुग्णालयात उपस्थित नसल्याचं आढळले. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संजय जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं?
डोंबिवलीच्या खंबाळपाड्यात प्राणवी भोईर ही चिमुकली सुट्टीनिमित्त तिची मावशी श्रृती ठाकूर हिच्याकडे राहायला गेली होती. २८ सप्टेंबरच्या रात्री या दोघी गाढ झोपेत असताना मण्यार जातीच्या सापाने त्यांना दंश केला. या घटनेनंतर दोघींना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोन्ही रुग्णांना तात्काळ सर्पदंश विरोधी लस देण्यात आली. प्रयोगशाळेत बीसी-सीटी तपासण्या करण्यात आल्या. मात्र प्राणवी हिची तब्येत चिंताजनक झाली. तिला ठाण्यातील रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र दुर्दैवाने प्राणवीचा मृत्यू झाला.
तर प्राणवीची मावशी श्रृती ठाकूर हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु ३० सप्टेंबरला तिचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईक आक्रमक झाले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याने दोघींचा जीव गेला असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर संबधित घटनेबाबत महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुलासा मागितला. त्यात डॉ. संजय जाधव यांची ड्युटी असताना ते रुग्णालयात उपस्थित नव्हते हे समोर आले. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.