मराठी येत नसल्याने २ कर्मचाऱ्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:04 IST2025-11-11T06:04:02+5:302025-11-11T06:04:31+5:30
Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठी येत नसल्याने २ कर्मचाऱ्यांना मारहाण
कल्याण - मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. आमचे कर्मचारी नेपाळी आहेत. ते मराठी शिकत आहेत. आम्ही मराठी आहोत. सहा महिने झाले, हा व्यवसाय आम्ही सुरू केला आहे. या नशेखोर तरुणांना पोलिसांनी धडा शिकवला पाहिजे. जेणे करून अन्य कोणासोबत अशी घटना घडू नये, अशी मागणी खानावळ चालक संदीप आढाव याने केली आहे.
चक्कीनाका परिसरात रिद्धी खानावळ आहे. येथे चार तरुण आले. चौघेही नशेत होते. एकाने वडापाव घेतल्यानंतर पैशावरून थोडा झाला. खानावळीतील कर्मचारी हिंदीत बोलू लागले. तुला मराठी येत नाही, असा जाब विचारत खानावळीची ताेडफाेड केली. तसेच त्यांनी कर्मचारी कुमार थापा, मदन यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर त्यांनी तेथून पळ काढला.
भरपाई देणार कोण?
खानावळीचा चालक संदीप आढाव याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मराठी आहोत. सहा महिन्यांपूर्वीच कसेबसे पैसे जमावून हा व्यवसाय सुरू केला. आमच्या कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही. हे वास्तव आहे. त्यांना मराठी शिकवतोय. धिंगाणा करणारे नेहमी येथील नागरिकांना त्रास देतात. पोलिसांनी या चौघांच्या विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे. आमचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण देणार? या हल्लेखाेरांचा इतरही नागरिकांना त्रास हाेताे. त्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल आढाव यांनी उपस्थित केला आहे.