उल्हासनगर महिला सुधारगृहातून १२ महिलेचे पलायन; ७ जणांचा पोलिसांनी घेतला शोध
By सदानंद नाईक | Updated: October 5, 2025 22:35 IST2025-10-05T22:34:48+5:302025-10-05T22:35:04+5:30
पोलिसांनी १२ पैकी ७ महिलेचा शोध घेण्यात यश मिळविले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

उल्हासनगर महिला सुधारगृहातून १२ महिलेचे पलायन; ७ जणांचा पोलिसांनी घेतला शोध
उल्हासनगर : कॅम्प नं-५, शांतीसदन येथील महिला सुधारगृहातुन २ ऑक्टोबर रोजी रात्री १२ महिलेने पलायन केल्याचा प्रकार उघड होऊन याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी १२ पैकी ७ महिलेचा शोध घेण्यात यश मिळविले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ व ५ परिसरात विविध शासकीय वस्तीगृह व सुधारगृह आहेत. कॅम्प नं-५, शांतीसदन येथे महिलांचे शासकीय सुधारगृह आहे. या महिला सुधारगृहातून १२ महिलांनी २ ऑक्टोबर रोजी रात्री सुरक्षा यंत्रणेला चकमा देत पलायन केल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून महिला सुधारगृहात सुरक्षेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी पोलीस पथके पाठवून १२ पैकी ७ महिलांचा शोध घेण्यात यश मिळविले. तर इतर महिलांचा लवकरच शोध घेतला जाईल, असे संकेत दिले. यापूर्वीही महिला सुधारगृहातून महिला पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर सरकारी मुलीच्या सुधारगृहातून मुली पळून गेल्याच्या घटना गेल्या सहा महिन्यात दोन वेळा घडल्याने, वस्तीगृहाच्या कारभारावर व सुरक्षेवर प्रश्नचिन्हे उभे राहिले आहे.
सरकारी महिला सुधारगृहाच्या अधिक्षिका अर्चना पवार ह्या काही दिवसापासून सुट्टीवर आहेत. तर महिला जिल्हा अधिकारी नमिता शिंदे यांनी सुधारगृहातून १२ महिला पळून गेल्याची माहिती दिली. त्यापैकी ७ महिलाचा पोलिसांनी शोध घेतल्याचे सांगितले. महिला गृहात एकूण २१ महिला असून त्यापैकी १२ महिला पळून गेल्या होत्या.