अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:24 IST2026-01-07T14:23:33+5:302026-01-07T14:24:33+5:30
Ambernath Congress Local Body Election 2025: भाजप-काँग्रेस यांच्या आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत होती

अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
Ambernath Congress Local Body Election 2025: अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ झाली. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर सर्व स्तरावर टीका झाली. अखेर काँग्रेसने त्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्यासोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे.

भाजप-काँग्रेस युतीवर मुख्यमंत्री फडणवीसही नाराज
"मी स्पष्ट शब्दात सांगतोय काँग्रेस आणि एमआयएमसोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल, तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि १०० टक्के यावर कारवाई होणार," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे काय?
"शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू", असे स्पष्टीकरण काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी युतीच्या घोषणावेळी सांगितले होते.
शिंदेसेनेचे मत काय?
"काही लोक सत्तेसाठी अशाप्रकारची आघाडी काही करत असतील, तर यात वरिष्ठांनी लक्ष दिले पाहिजे. शिवसेना कायम विरोधात बसलेली आहे. शिवसेनेला विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला फारसा फरक पडणार नाही. पण लोकांच्या भावना काय आहेत, लोक काय म्हणून या गोष्टीकडे पाहतात, ते महत्त्वाचे आहे. आज ज्या प्रवृत्तीच्या विरोधात शिंदे यांनी उठाव केला, त्याच प्रवृत्तीबरोबर पुन्हा एकत्र जाण्याचे काम काही लोक स्वार्थासाठी करताना दिसत आहेत. मला असे वाटते की याबाबत आता वरिष्ठांनी योग्यप्रकारे निर्णय करणे आवश्यक आहे. सत्ता हेच सर्वस्व नाही, हे वरिष्ठांनी त्यांना लक्षात आणून दिले पाहिजे," अशा शब्दांत खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक भाजपा नेतृत्वावर टीका केली.