- स्वदेश घाणेकर

प्रो कबड्डीच्या ७ व्या मोसमातील शनिवारी झालेल्या सामन्यात यजमान यू मुंबानं घरच्या मैदानावर विजयी सलामी दिली. पहिल्या सत्रात यू मुंबाला तोडीस तोड उत्तर देणाऱ्या पुणेरी पलटनची गाडी मध्यंतरानंतर घसरली अन् मुंबाने हा सामना ३३-२३ असा जिंकला. पण पुणेरी पलटनने दुसऱ्या सत्रात मैदानावर उतरवलेल्या एका खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधले. हा खेळाडू पहिल्या सत्रापासून मैदानावर असता तर सामन्याचा निकाल पुण्याच्या बाजूने नक्की लागला असता, अशी कुजबूजही सुरू झाली. प्रो कबड्डीतील पदार्पणाच्या सामन्यात मिळालेल्या अल्प संधीत चर्चेत आलेला हा खेळाडू म्हणजे सुशांत साईल....

 

मूळचा कोल्हापूरचा पण मुंबईत लहानाचा मोठा झालेल्या सुशांतने शनिवारी प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटनकडून पदार्पण केले. सामन्यातील अखेरच्या ७ मिनिटांत सुशांत बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला. तेव्हा पुण्याचा संघ १७-२८ असा पिछाडीवर होता. पण सुशांतने पहिल्याच चढाईत मुंबाचा कर्णधार फैझल अत्राचली आणि हरेंद्र कुमार या प्रमुख खेळाडूंना बाद केले. त्यानंतर सुरिंदर सिंगला माघारी पाठवून पुण्याची पिछाडी कमी केली. 

अत्यंत जलदगतीनं डावीकडून उजवीकडे अन् उजवीकडून डावीकडे चढाई करणाऱ्या सुशांतने पुण्याच्या खेळाडूंना विजयाची आस दाखवली. पण अखेरच्या पाच मिनिटांत ते १० गुणांची पिछाडी भरू शकले नाही, परंतु सुशांतने सर्वांचे लक्ष वेधले. पदार्पणाच्या सामन्यात पराभव आल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. पण न खचता पुढे अधिक चांगला खेळ करण्याचा निर्धार त्यानं बोलून दाखवला.
तो म्हणाला," पहिला सामना असल्याने थोडेसे दडपण होते. पण अनुप कुमारसारखे अनुभवी खेळाडू कोच असताना ते दडपण सहज निघून गेले. चढाईत आम्ही थोडे कमी पडलो. पण पुढच्या सामन्यात कमबॅक करू." 

मुंबईच्या अंकुर क्रीडा मंडळातून कबड्डीचे धडे गिरवणाऱ्या सुशांतला घरातूनच बाळकडू मिळाले आहे. वडिलांकडून चालत आलेली कबड्डीची परंपरा सुशांतने कायम राखली आहे. तो म्हणाला,"मी मूळचा कोल्हापूरचा पण लहानाचा मोठा मुंबईत झालो. वडिलांमुळे कबड्डीच्या प्रेमात पडलो. त्यांना पाहून कबड्डी शिकलो. मोठा भाऊही कबड्डी खेळतो. त्यामुळे हा खेळ अधिक जवळचा वाटतो . पण प्रो कबड्डीमध्ये कधी खेळायला मिळेल, असे सुशांतला स्वप्नातही वाटले नव्हते. "प्रो कबड्डीचे अनेक सामने प्रेक्षकांमध्ये बसून पाहिले होते. पण प्रेक्षकांत बसून प्रो कबड्डीचं हे मैदान गाठण्याचे स्वप्न आज पूर्ण झाल्याचा आनंद आहे. आता मागे वळून पाहायचे नाही... ही संधी आयुष्याला कलाटणी देणारी आहे आणि ती इतक्या सहज दवडायची नाही. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आणि त्या दिशेनं टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे," असे सुशांत आत्मविश्वासानं सांगत होता.

Web Title: PKL 2019 : Spectators to Pro Kabaddi team Puneri Paltan's Raider; journey of Mumbai's Sushant Sail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.