आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 16:31 IST2025-09-20T16:31:05+5:302025-09-20T16:31:56+5:30
कार खरेदी करण्यासाठी प्रत्येकी १०० रुपयांची देणगी मागण्यास सुरुवात केली. तिचे हे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
आजकाल भीक मागण्याची पद्धत बदलली आहे. लोक सहसा रस्त्यावर किंवा मॉलबाहेर भीक मागतात, परंतु आता सोशल मीडियावर लोक त्यांच्या गरजा थेट ऑनलाईन शेअर करत आहेत. या ट्रेंडला अनुसरून ब्रिटनच्या जेम्मा केलीने स्वतःसाठी कार खरेदी करण्यासाठी प्रत्येकी १०० रुपयांची देणगी मागण्यास सुरुवात केली. तिचे हे आवाहन सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.
ग्लॉसेस्टरशायरची रहिवासी जेम्मा केलीने टिकटॉकवर लोकांकडे १ पौंड (११८ रुपये) देणगी मागण्यास सुरुवात केली. ती म्हणते की, तिला लक्झरी कार नको आहे, फक्त एक साधी कार हवी आहे जेणेकरून ती आणि तिची मुलं आरामात प्रवास करू शकतील. तिच्या व्हिडिओमध्ये जेम्माने स्पष्ट केलं की, तिने एका महिलेला ४०,००० लोकांकडून १ पौंड मागताना पाहिलं. हे पाहून ती देखील प्रेरित झाली आणि तिने तिच्या छोट्या ध्येयासाठी ऑनलाईन देणगी मागण्याचा निर्णय घेतला.
जेम्माच्या आवाहनाला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाला. फक्त ४८ तासांत तिला २०० पौंड (अंदाजे २३,००० रुपये) मिळाले. व्हिडिओमध्ये तिने तिच्या फॉलोअर्सचे आभार मानले आणि अनेकांनी उदारपणे देणगी दिल्याचं नमूद केलं. आता जेम्माचं ध्येय तिच्या टिकटॉक पेजला १०,००० फॉलोअर्सपर्यंत पोहोचवणं आहे जेणेकरून तिला प्लॅटफॉर्मच्या क्रिएटर फंडमधून अतिरिक्त मदत आणि कमाई होऊ शकेल.
टिकटॉक क्रिएटर फंड पात्र क्रिएटरना त्यांच्या कंटेंटच्या आधारे पैसे देतं. किती लोक सामील होऊ शकतात यावर कोणतीही मर्यादा नाही. जेम्माचा असा विश्वास आहे की जर तिचे पेज १०,००० फॉलोअर्सपर्यंत पोहोचलं तर ती लवकरच कार खरेदी करू शकेल. तिने स्पष्ट केलं की, दोन वर्षांपूर्वी तिची कार खराब झाली होती आणि तिला ती बदलण्याची किंवा दुरुस्त करण्याची संधी मिळाली नव्हती. यामुळे तिला तिची नोकरी देखील सोडावी लागली.