आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:58 IST2025-10-24T12:57:46+5:302025-10-24T12:58:30+5:30
इब्राहिमने स्वतःचं डोकं एका पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याची चावी दररोज तो त्याची पत्नी आणि मुलीला देतो.

आयडियाची कल्पना! सिगारेटचं व्यसन सोडण्यासाठी लढवली शक्कल; डोकं केलं पिंजऱ्यात बंद
सिगारेटचं व्यसन सोडणं हे सोपं नाही. हे कठीण काम पूर्ण करण्यासाठी एका तुर्कीतील व्यक्तीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. इब्राहिम युसेलने एक अशी पद्धत अवलंबली जी कदाचित सर्वात विचित्र आणि मनोरंजक ठरली. इब्राहिमने स्वतःचं डोकं एका पिंजऱ्यात बंद केलं आणि त्याची चावी दररोज तो त्याची पत्नी आणि मुलीला देतो.
इब्राहिम युसेल २६ वर्षांपासून दररोज दोन पॅकेट सिगारेट ओढत होता. त्याने अनेक वेळा सिगारेट सोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं व्यसन नेहमीच त्याच्या इच्छेपेक्षा वरचढ ठरलं. पण एके दिवशी त्याने व्यसन सोडण्यासाठी एक वेगळी पद्धत वापरण्याचा निर्णय घेतला. त्याने त्याच्या डोक्याभोवती एक पिंजरा बांधला, जो तो दररोज लावतो आणि त्याची चावी त्याच्या कुटुंबाला देतो, जेणेकरून तो सिगारेट ओढू शकत नाही.
बाईकच्या हेल्मेटपासून प्रेरित होऊन इब्राहिमने ४० मीटर तांब्याच्या तारेचा वापर करून स्वतःचा "डोक्यासाठी पिंजरा" तयार केला. हा पिंजरा पूर्णपणे बंद होता, ज्यामुळे तो कोणत्याही परिस्थितीत धूम्रपान करू शकत नाही. सिगारेटपासून दूर राहण्यासाठी तो असं करतो. हा एक दिवसाचा स्टंट नव्हता, इब्राहिम रोज असं करतो. यामुळे खाणं-पिणं थोडं कठीण झालं आहे.
इब्राहिमच्या पत्नीने त्याला पूर्ण पाठिंबा दिला, कारण पतीच्या आरोग्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं तिला वाटत आहे. इब्राहिम युसेलची ही गोष्ट काही वर्षांपूर्वीची आहे, परंतु ती इंटरनेटवर पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाली आहे. त्याची अनोखी गोष्ट सिद्ध करतं की, जर एखाद्या व्यक्तीने दृढनिश्चय केला तर कोणतीही सवय मोडता येते. आता याची चर्चा रंगली आहे.