वॉश बेसिनमध्ये 'या' छोट्या छिद्राचं रहस्य काय? रोज बघत असाल पण माहीत नसेल याचं काम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:38 IST2026-03-17T12:37:50+5:302026-03-17T12:38:29+5:30
Interesting Fact : एखाद्या वस्तूमध्ये एखादी खास किंवा शुल्लक वाटणारी गोष्ट का असते? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. अशाच एका रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूबाबत आपल्याला सांगणार आहोत.

वॉश बेसिनमध्ये 'या' छोट्या छिद्राचं रहस्य काय? रोज बघत असाल पण माहीत नसेल याचं काम...
Interesting Fact : रोज आपल्या डोळ्यांसमोरून कितीतरी गोष्टी जात असतात....कित्येक नवीन किंवा जुन्याच म्हणजे माहीत असलेल्या गोष्टी दृष्टीस पडतात. रोजच्याच गोष्टी असल्याने त्यांकडे आपण फारचं काही खास लक्ष देत नाही. पण जर या गोष्टी बारकाईने पाहिल्या तर कळतं की, रोज वापरल्या जाणाऱ्या किंवा दिसणार्या वस्तूंच्या डिझाइनमध्ये अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात, ज्यांचा आपण कधी विचारही केलेला नसतो. सामान्य गोष्टी समजून आपण कानाडोळा करतो. एखाद्या वस्तूमध्ये एखादी खास किंवा शुल्लक वाटणारी गोष्ट का असते? हे जाणून घेण्याचा प्रयत्नच केला जात नाही. अशाच एका रोज वापरल्या जाणाऱ्या वस्तूबाबत आपल्याला सांगणार आहोत.
हल्ली जवळपास सगळ्याच घरांमध्ये वॉश बेसिन बघायला मिळतं. ज्याचा वापर रोज दिवसभर केला जातो. सकाळी ब्रश करण्यापासून ते हात धुण्यापर्यंत वेगवेगळ्या कामांसाठी वॉश बेसिनचा वापर केला जातो. पण हेच आपल्या वेगवेगळ्या कामात येणाऱ्या वॉश बेसिनला आपण कधी बारकाईने पाहिलंय का? जर पाहिलं असेल तर वॉश बेसिनच्या नळाखाली आपल्याला एक छोटं छिद्र दिसत असेल. आपण कधी विचार केलाय का की, बेसिनमध्ये हे छोटं छिद्र कशासाठी असतं? नसेल केला तर आज जाणून घेऊया त्याचं काम...
कशासाठी असतं हे छिद्र?
अनेकांना वाटत असेल की, बेसिनमधील हे छिद्र बेसिनच्या डिझाइनचा भाग असेल. पण असं अजिबात नाहीये. खरंतर या छिद्राला ओव्हरफ्लो होल म्हटलं जातं. आता त्याचं काय काम असतं हे जाणून घेऊया. हे छिद्र एकप्रकारचं सेफ्टी फीचर असतं. जर चुकून नळ सुरू राहिला किंवा मुख्य ड्रेनमध्ये काही कचरा अडकला तर या छिद्रामुळे पाणी बेसिनच्या बाहेर येणार नाही. याच्या मदतीने अतिरिक्त पाणी पाइपच्या माध्यमातून थेट ड्रेनेज सिस्टीममध्ये जाईल.
हवा पास करणे
वॉश बेसिनमधील या छोट्या छिद्राचं दुसरं काम म्हणजे हवा पास करणं. जेव्हा ड्रेनच्या छिद्रातून हवा निघत नाही तेव्हा पाणी हळूहळू सिंकमधून बाहेर पडतं. अशात या छिद्राच्या माध्यमातून हवा पास होते. हवा व्यवस्थित निघाल्यावर सिंक व्यवस्थित काम करतं. इतकंच नाही तर बाथटबमध्ये देखील असं एक छोटं छिद्र असतं. त्यालाही ओव्हरफ्लो होल असं म्हणतात.
प्लास्टिक स्टूलमध्ये का असतं छिद्र?
प्लास्टिकच्या स्टूलमध्ये छोटं छिद्र असण्याला काही खास उद्देश आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे प्रेशर आणि व्हॅक्यूम पास करणं. स्टूल घरातील जास्त जागा घेत नाहीत, ते एकावर एक ठेवता येतात. जेव्हा त्यावर बसायचं असतं तेव्हा ते वेगळे केले जातात. अशात जर त्यांमध्ये छिद्र नसेल तर स्टूल एकावर एक ठेवल्यानं प्रेशर आणि व्हॅक्यूममुळे आपसात फसतात. ज्यामुळे त्यांना वेगळं करणं अवघड होतं. अधिक जोर लावावा लागतो. पण यात छिद्र असल्याने ते सहजपणे वेगळे करता येतात. हेच या छिद्राचं मुख्य काम असतं. पण याचे इतरही काही फायदे आहेत.