केवळ थंडीतच तोंडातून वाफ का निघते, उन्हाळा-पावसाळ्यात कुठे गायब होतो हा 'धूर'? पाहा यामागचं सायन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 10:13 IST2025-12-30T10:08:22+5:302025-12-30T10:13:31+5:30
Interesting Facts : डिसेंबर आला की आपल्या पोटात काही पेटतं का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जून-जुलैच्या उकाड्यात ही ‘जादू’ अचानक का गायब होते?

केवळ थंडीतच तोंडातून वाफ का निघते, उन्हाळा-पावसाळ्यात कुठे गायब होतो हा 'धूर'? पाहा यामागचं सायन्स
Interesting Facts : सध्या बऱ्याच भागांमध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे. लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जॅकेट, ब्लॅंकेट या गोष्टींचा वापर करतात. थंडीमुळे या दिवसांमध्ये आपल्याला एक वेगळा आणि इंटरेस्टींग असा अनुभवही येतो. आपण पाहिलं असेल की, रजईतून बाहेर आल्यावर अचानक आपल्या तोंडातून पांढऱ्या धुरासारखा मोठा लोट बाहेर येतो. लहानपणी तर आपण सगळेच मित्रांसमोर शान मारण्यासाठी हे केलं असेल. ना काडी, ना सिगारेट, फक्त “फुं” करून धुराचे वर्तुळ काढायचा प्रयत्न! पण कधी विचार केलाय का, हा धूर नेमका येतो तरी कुठून? डिसेंबर आला की आपल्या पोटात काही पेटतं का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जून-जुलैच्या उकाड्यात ही ‘जादू’ अचानक का गायब होते?
शरीर एक ‘चालतं-फिरतं हीटर’
सर्वात आधी हे समजून घ्यायला हवं की आपलं शरीर सुमारे 70% पाण्याने बनलेलं आहे. आपली फुफ्फुसं कायम ओलसर असतात. आपण श्वास सोडतो तेव्हा फक्त हवाच बाहेर जात नाही, तर शरीरातील उष्णता आणि थोडी ओलही बाहेर पडते. ही ओल वायुरूपात असते, म्हणून ती आपल्याला दिसत नाही.
थंड हवा आणि गरम श्वास यांचा सामना
हिवाळ्यात बाहेरचं वातावरण खूप थंड असतं, तर आपल्या शरीराचं तापमान साधारण 37 अंश सेल्सियस इतकं असतं. तोंडातून बाहेर पडलेली गरम हवा बाहेरच्या बर्फाळ हवेसोबत मिक्स होते, तशी ती लगेच थंड होते. थंडीमुळे हवेतली ती ‘अदृश्य ओल’ लगेच पाण्याच्या अगदी छोट्या-छोट्या थेंबांमध्ये बदलते. सायन्सच्या भाषेत या प्रक्रियेला ‘कंडेन्सेशन’ म्हणतात. हाच तो प्रकार आहे ज्यामुळे आकाशात ढग तयार होतात. म्हणजेच, हिवाळ्यात तोंडातून बाहेर येणारा तो धूर नसून, एक छोटासा ढगच असतो.
मग उन्हाळ्यात हा धूर का दिसत नाही?
आता प्रश्न पडतो की हा ‘पांढरा धूर’ उन्हाळ्यात कुठे जातो? खरंतर, उन्हाळ्यात बाहेरचं तापमानही शरीराच्या तापमानाच्या आसपासच असतं. तुम्ही श्वास सोडता तेव्हा शरीरातून निघालेल्या गरम हवेला बाहेर गरम हवा भेटते. तापमानात फारसा फरक नसल्यामुळे त्या ओलसर हवेला थंड होऊन पाण्याच्या थेंबांमध्ये बदलण्याची संधीच मिळत नाही. ती वायुरूपातच हवेत मिसळते आणि म्हणून आपल्याला काहीच दिसत नाही. तर अशी ही तोंडातून निघणाऱ्या धुराची गंमत आहे.