काकडीचं टोक घासल्यावर निघणारा पांढरा फेस नेमका काय, त्याने काही नुकसान होतं का? खाण्याआधी जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:25 IST2026-03-04T13:23:48+5:302026-03-04T13:25:17+5:30
Cucumber Amazing Facts : आपण कधी पाहिलं असेल की, काही लोक काकडी पूर्णपणे कापण्यापूर्वी तिचे टोक साधारण १-२ मिनिटे चोळले जाते. असं केल्यानं काय होतं जाणून घ्या...

काकडीचं टोक घासल्यावर निघणारा पांढरा फेस नेमका काय, त्याने काही नुकसान होतं का? खाण्याआधी जाणून घ्या...
Cucumber Amazing Facts : उन्हाळ्यात काकडीची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. काकडीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असल्याने या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यास काकडी खूप मदत करते. जेवण करताना लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने काकडी खातात. कापलेल्या काकडीवर हलकं मीठ आणि तिखट टाकलं तर मजाच वेगळी येते. बरेच लोक काकडीवर चाट मसाला आणि लिंबू लावून आवडीने खातात.
आपण कधी पाहिलं असेल की, काही लोक काकडी पूर्णपणे कापण्यापूर्वी तिचे टोक साधारण १-२ मिनिटे चोळले जाते. यामागे वेगवेगळ्या कारणांच्या चर्चा केल्या जातात. विशेष म्हणजे काकडीचे टोक चोळल्यावर त्यातून पांढऱ्या फेसासारखा पदार्थ बाहेर येतो. तो नेमका काय असतो? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
काकडीमध्ये किती पाणी असतं?
काकडी खाणाऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते की काकडीमध्ये नेमकं किती पाणी असतं? वेगवेगळ्या रिपोर्टनुसार, काकडीमध्ये साधारण ९५ ते ९६.७ टक्के पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी अतिशय उपयुक्त ठरते.
काकडी कापण्यापूर्वी टोक का चोळतात?
सामान्य समजुतीनुसार काकडीची कडवट चव कमी करण्यासाठी तिचे टोक चोळले जाते. काकडीच्या देठाजवळच्या भागात कुकुर्बिटासिन नावाचा एक नैसर्गिक घटक आढळतो. हाच घटक काकडी कडू लागण्यास कारणीभूत असतो. काकडीचे दोन्ही कापलेले टोक एकमेकांवर चोळल्यास हा कडवट रस बाहेर येतो, असं मानले जातं. त्यामुळे काकडीची चव थोडी सौम्य होते.
काकडी चोळल्यावर पांढरा फेसासारखा पदार्थ काय असतो?
काकडीच्या वरच्या आणि खालच्या टोकाला चोळल्यावर जो पांढरा फेसासारखा पदार्थ दिसतो, तो म्हणजे कुकुर्बिटासिनच असतो. हा कोणताही कृत्रिम केमिकल नसून काकडीतील नैसर्गिक कडवट रस आहे. काही लोकांना वाटते की हा रासायनिक पदार्थ असतो, पण प्रत्यक्षात तो काकडीतील नैसर्गिक तत्व आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.