भारतातील असे रेल्वे स्टेशन जिथे एक - दोन नाही चार भाषांमध्ये केली जाते अनाउन्समेंट, पाहा कोणतं आहे हे स्टेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:11 IST2026-03-16T13:09:46+5:302026-03-16T13:11:27+5:30
Railway Interesting Facts: आज आम्ही आपल्याला अशाच वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, हे स्टेशन देशातील एकुलतं एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ४ भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.

भारतातील असे रेल्वे स्टेशन जिथे एक - दोन नाही चार भाषांमध्ये केली जाते अनाउन्समेंट, पाहा कोणतं आहे हे स्टेशन
Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे आता कात टाकत आहे. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाने स्टेशन अपडेट केले जात आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या सुविधांची व्यवस्था केली जात आहे. भारतात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. त्यातील काही रेल्वे स्टेशन असे आहेत जे आपल्या एखाद्या खास गोष्टीसाठी ओळखले जातात. अशा अनोख्या रेल्वे स्टेशनचे व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. एखाद्या रेल्वे स्टेशनचं नाव सगळ्यात लांब असतं, तर एखादं रेल्वे स्टेशन दोन राज्यात विभागलेलं असतं किंवा एखाद्या रेल्वे स्टेशनवर सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असतात. आज आम्ही आपल्याला अशाच वेगळ्या रेल्वे स्टेशनबाबत सांगणार आहोत, हे स्टेशन देशातील एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे ४ भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.
भारतात एकूण किती रेल्वे स्टेशन?
काही मिडिया रिपोर्टनुसार भारतात साधारण ७ हजार ३४९ रेल्वे स्टेशन आहेत. हे रेल्वे विशाल नेटवर्क देशभरातली प्रवाशांना जोडतं आणि यात हॉल्ट, छोटे स्टेशन, जंक्शन आणि टर्मिनलचा समावेश आहे. आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, रेल्वेने देशात रोज जवळपास २ कोटी ४० लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलियासारख्या देशाच्या एकूण लोकसंख्येएवढी आहे. देशात रोज १३ हजारांपेक्षा अधिक प्रवासी रेल्वे धावतात, ज्या ७ हजारांपेक्षा जास्त स्टेशन्सना जोडतात.
कोणत्या स्टेशनवर चार भाषांमध्ये अनाउन्समेंट
आपण अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, तेव्हा आपण स्टेशनवर इंग्रजी, हिंदी भाषांमधील अनाउन्सनेंट ऐकल्या असतीलच. जास्तीत जास्त स्टेशनवर या दोन मुख्य भाषा वापरल्या जातात. पण आपल्याला माहीत नसेल की, देशात एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे चार भाषांमधून अनाउन्समेंट केली जाते. हे रेल्वे स्टेशन म्हणजे नवापूर रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनवर हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते.
नवापूर रेल्वे स्टेशनसोबतच देशात आणखी एक असं रेल्वे स्टेशन आहे जिथे चार भाषांमध्ये अनाउन्समेंट केली जाते. ते म्हणजे वेंकटनरसिम्हाराजुवारिपेटा. हे एक छोटं रेल्वे स्टेशन असून तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर आहे. इथे तमिळ, तेलगू, इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनाउन्समेंट केली जाते.
नवापूर रेल्वे स्टेशनची आणखी एक खासियत
पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत येणार्या या रेल्वे स्टेशनच्या बऱ्याच गोष्टी खास आहेत. नवापूर रेल्वे स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हे स्टेश महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यात विभागलं आहे. हे स्टेशनच नाही तर येथील प्लॅटफॉर्मवरील खुर्च्याही दोन राज्यात विभागल्या आहेत. या स्टेशनवर दोन्ही राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचे कायदे लागू आहेत.