कोणत्या देशात तुरूंगातून पळून जाणं नाही बेकायदेशीर? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:47 IST2026-03-09T14:47:07+5:302026-03-09T14:47:41+5:30
Prison Escape Law : काही देश असेही आहेत, जे तुरूंगातून पळून जाण्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. आज आपण एका अशा देशाबाबत जाणून घेणार आहोत.

कोणत्या देशात तुरूंगातून पळून जाणं नाही बेकायदेशीर? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण
Prison Escape Law : तुरूंगातून पळून जाणं हा एक गंभीर गुन्हा असतो. जगातील जास्तीत जास्त देशांमध्ये हा मोठा गुन्हा मानला जातो. गुन्हेगार जर तुरूंगातून पळाला तर त्याची शिक्षा आणखी वाढवली जाते. पण काही देश असेही आहेत, जे तुरूंगातून पळून जाण्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. आज आपण एका अशा देशाबाबत जाणून घेणार आहोत, जिथे तुरूंगातून पळून जाणं कोणताही गुन्हा नाही.
जर्मनीमध्ये तुरूंगातून पळून जाणं गुन्हा नाही. प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक स्वातंत्र्य हवं असतं, या विचाराने येथील कायदे बनवले आहेत. कायदे बनवणाऱ्यांचं असं मत आहे की, तुरूंगातून पळून जाण्याचा प्रयत्न करणं एक बेसिक मानवी प्रतिक्रिया आहे. जर्मनीतील कायदा याला कोणताही गुन्हा मानत नाही. जर एखादा कैदी पळून जाण्यात यशस्वी ठरला आणि त्याला नंतर अधिकाऱ्यांनी पकडलं तर त्याला जास्तीची शिक्षाही सुनावली जात नाही. कैद्याला फक्त तुरूंगात परत पाठवलं जातं.
पळून जाणं इथे गुन्हा नसला तरी पळून जाताना जर कोणता गंभीर अपराध केला तर तो गुन्हा मानला जातो. जसे की, पळून जाताना तुरूंगाच्या प्रॉपर्टीचं नुकसान करणं, गार्डवर हल्ला करणं, साहित्य चोरी करणं किंवा पळून जाण्यासाठी लाच देणं या अपराधांसाठी कैद्यावर वेगवेगळे कलम लावले जातात आणि त्याची शिक्षा वाढवली जाते.
जर्मनीच्या कायद्यानुसार एखाद्या कैद्याने स्वत:हून पळून जाण्याचा प्रयत्न करणं सहन केलं जातं. पण जर बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने एखाद्या कैद्याला शस्त्र, वाहन किंवा राहण्यासाठी जागा देऊन पळण्यास मदत केली तर त्या व्यक्तीवर क्रिमिनल चार्ज लावले जातात. भलेही पळून जाणं हा गुन्हा नसला तरी तुरूंगातील कैद्यांच्या स्थितीवर ही बाब वाईट प्रभाव टाकते. जर एखादा कैदी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल तर अधिकारी पेरोलच्या संधी आणि लवकर सुटका असे खास अधिकार कमी करू शकतात.
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, कैद्यांच्या पळून जाण्याबाबत केवळ जर्मनीतच नाही तर इतरही काही देशांमध्ये असे कायदे, नियम आहेत. ऑस्ट्रेलिया, बेल्जिअम आणि मेक्सिकोसारख्या देशांमध्ये सुद्धा जर्मनीसारखी सिस्टीम पाळली जाते.