रेल्वेतील पाणी नेमकं स्टोर कुठे केलं जातं? वापरलं तर अनेकदा असेल, पण माहीत नसेल उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 17:05 IST2026-03-19T17:04:26+5:302026-03-19T17:05:03+5:30
Interesting Facts : अनेकदा रेल्वेतील अनेक गोष्टींचा वापर आपण करतो, पण त्याबाबत आपल्याला माहिती नसते. जसे की, पाणी स्टोरेज.

रेल्वेतील पाणी नेमकं स्टोर कुठे केलं जातं? वापरलं तर अनेकदा असेल, पण माहीत नसेल उत्तर
Interesting Facts : भारतात जास्तीत जास्त लोक रेल्वेने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. कारण रेल्वेचा प्रवास हा आरामदायक आणि स्वस्त असतो. शिवाय काही मोजकी ठिकाणं सोडली तर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात रेल्वेने पोहोचता येतं. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेच्या प्रवासात अनेक नवीन गोष्टींचा अनुभव आला असेल. पण आपल्याला अनेक गोष्टी माहितही नसतील. अनेकदा रेल्वेतील अनेक गोष्टींचा वापर आपण करतो, पण त्याबाबत आपल्याला माहिती नसते. जसे की, पाणी स्टोरेज.
रेल्वेत पाणी कुठे स्टोर केलं जातं?
रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी टॉयलेटची व्यवस्था केलेली असते. प्रवासादरम्यान लोक अनेकदा हात धुण्यासाठी, तोंड धुण्यासाठी आणि टॉयलेटला जाण्यासाठी पाण्याचा वापर करतात. पण आपण कधी विचार केलाय का की, रेल्वेतील टॉयलेटच्या नळाला किंवा बेसिनमध्ये जे पाणी येतं ते कुठे स्टोर केलं जातं? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेकांना हे माहीत नसतं की, रेल्वेच्या प्रत्येक डब्याच्या खाली स्टीलचे मोठे टँक लावलेले असतात आणि त्यामध्ये पाणी स्टोर केलेलं असतं. कोचमध्ये लावलेल्या टँकला अंडरकॅरेज वॉटर टँक म्हणतात. सामान्यपणे हे टँक ४०० ते ५०० लीटर पाणी स्टोर करू शकतात. सगळ्याच कोचखाली टँक लावलेले असतात, त्यामुळे पाण्याची अडचण येत नाही. पण समजा टँकमधील पूर्ण पाणी संपलं तर काय? असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो.
LBH कोच असलेल्या रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये पाण्याच्या दोन टँक लावलेल्या असतात. या कोचच्या खाली लावलेल्या असतात. एका टँकमध्ये ६८५ लीटर पाणी स्टोर केलं जाऊ शकतं. म्हणजे एका कोचच्या दोन टँकमध्ये १,३७० लीटर पाणी स्टोर असतं. वेगवेगळ्या रेल्वेत वेगवेगळ्या क्षमतेचे टँक लावले जातात.
अर्ध्या प्रवासातच पाणी संपलं तर काय?
जर समजा काही कारणाने या टँकमधील पाणी अर्ध्या प्रवासातच संपलं तर प्रवास करणं अवघड होईल. कारण वेगवेगळ्या कामांसाठी पाणी लागतंच. पाणी नसेल तर टॉयलेटही घाणेरडे होतील. अशात जर मधेच पाणी संपलं तर या टँकमध्ये क्विक वॉटरिंग सिस्टीमने पाणी भरलं जातं. ही सिस्टीम मोठ्या रेल्वे स्टेशनवर असते. आपणही पाहिलं असेल की, दोन ट्रॅकच्या मधे एक पाइपचं कनेक्शन लावलेलं असतं. जे खिडकीतून सहजपणे दिसतं. हीच क्विक वॉटरिंग सिस्टीम असते, ज्याने पाणी भरलं जातं.