जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा आइसक्यूब कसे बनवले जात होते? उत्तर असं ज्याचा विचारही केला नसेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:50 IST2026-01-26T12:49:50+5:302026-01-26T12:50:22+5:30
Interesting Facts : फ्रिजचा विचार केला तर घरगुती जीवनात त्याची भूमिका खूप मोठी आहे. फ्रिजमुळे थंड पाणी, बर्फ तसेच फळे-भाज्या साठवणं सोपं होतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फ्रिज नसताना पूर्वी बर्फ कसा तयार केला जात होता?

जेव्हा फ्रिज नव्हते तेव्हा आइसक्यूब कसे बनवले जात होते? उत्तर असं ज्याचा विचारही केला नसेल
Interesting Facts : आपल्या जीवनात आपण सर्वजण इतके सुविधा-सवयीचे झालो आहोत की मशीनशिवाय जगणे जरा अवघडट आहे. घरात एसीपासून फ्रिजपर्यंत आणि हीटरपासून गिझरपर्यंत अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांशिवाय जगणं शक्यच नाही असं वाटतं. आजच्या धावपळीच्या आयुष्यात या सर्व गोष्टी इतक्या मूलभूत गरजांमध्ये मोडतात की जणू त्या नसल्या तर आयुष्याची सरासरीच कमी होईल. फ्रिजचा विचार केला तर घरगुती जीवनात त्याची भूमिका खूप मोठी आहे. फ्रिजमुळे थंड पाणी, बर्फ तसेच फळे-भाज्या साठवणं सोपं होतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की फ्रिज नसताना पूर्वी बर्फ कसा तयार केला जात होता?
वाळवंटात तयार केल्या जात असलेल्या रचना
अटलांटिक इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या एका अहवालात वाळवंटात वापरल्या जाणाऱ्या प्राचीन बर्फनिर्मितीच्या पद्धतींचा उल्लेख आहे. अहवालानुसार फारसी लोकांनी ‘यखचल’ नावाच्या रचना बांधल्या होत्या, ज्यांना बर्फाचे खड्डे असेही म्हणता येईल. हे यखचल इ.स.पू. ४०० च्या सुमाराचे आहेत. इराणच्या कोरड्या प्रदेशात आजही सुमारे २० मीटर उंच असे घुमट आढळतात. हे यखचल केवळ बर्फ साठवण्यासाठीच नव्हे, तर बर्फ तयार करण्यासाठीही वापरले जात होते. वीजेच्या शोधापूर्वी शेकडो वर्षे कार्यरत असलेले हे अत्यंत प्रगत आणि टिकाऊ रेफ्रिजरेटर होते.
वाळवंटात असा गोठवला जायचा बर्फ
अहवालानुसार यखचलचा जमिनीवरील भाग जाड, शंखाच्या आकाराचा घुमट असायचा, ज्याची उंची साधारणपणे १० ते १८ मीटर इतकी होती. हे घुमट वाळू, माती, चुना, राख, शेळीचे केस आणि अंड्याच्या पांढऱ्या भागापासून तयार केले जात. भिंती सुमारे २ मीटर जाड असायच्या आणि वरच्या बाजूने निमुळत्या असायच्या. त्यामुळे गरम हवा वर जाऊन बाहेर पडत असे, तर थंड हवा खालीच अडकून राहत असे. त्यामुळे आतले तापमान स्थिर राहायचे आणि उन्हाळ्यातही आत थंडावा टिकून राहायचा.
घुमटाजवळ दगडाचे उथळ तलाव असायचे. हिवाळ्यातील रात्री या तलावात पाणी सोडले जायचे. कमी आर्द्रता आणि स्वच्छ आकाशामुळे, आजूबाजूचे तापमान शून्याच्या खाली न गेले तरी रात्री पाणी गोठत असे. आणखी एका पद्धतीत रात्री तलावाच्या पृष्ठभागावरील पाणी थंड होत असे, त्यामुळे हवामान तुलनेने उबदार असतानाही बर्फ तयार होत असे. ही प्रक्रिया वारंवार केल्याने बर्फाचे जाड थर तयार होत, जे फोडून खड्ड्यात साठवले जात.
भारतात फ्रिजशिवाय बर्फ कसा बनवला जायचा
भारतामध्ये बर्फनिर्मितीच्या पद्धतींबाबत काही माहिती विश्वकोशांमध्ये आढळते. अहवालांनुसार १७व्या शतकात भारतात हिमालयातून बर्फ आयात केला जात असे. मात्र तो अतिशय महाग असल्यामुळे १९व्या शतकात हिवाळ्यात दक्षिण भारतात कमी प्रमाणात बर्फ तयार केला जाऊ लागला.
उकळलेले व थंड केलेले पाणी छिद्र असलेल्या मातीच्या भांड्यांत भरून, पेंढ्यावर ठेवले जात होते. ही भांडी २-३ फूट रुंद आणि फक्त ८-१० इंच खोल अशा खड्ड्यांत ठेवली जात. हिवाळ्यातील रात्री पृष्ठभागावर पातळ बर्फाची थर जमायची, जी गोळा करून विकली जाई.
भारतात कुठे बर्फ तयार केला जात होता
अहवालांनुसार हुगळी-चुचुरा आणि इलाहाबाद येथे बर्फनिर्मितीची केंद्रे होती. ‘हुगळी बर्फ’ हा कठीण स्फटिकासारखा न दिसता मऊ, चिखलासारखा दिसत असल्यामुळे तो निकृष्ट मानला जात असे. भारतात पेये थंड करण्यासाठी पाणी आणि ‘साल्टपीटर’ एकत्र मिसळले जात असे. तर युरोपमध्ये पेय थंड करण्यासाठी सल्फ्युरिक अॅसिडचा वापर केला जात असे, मात्र त्यातून खऱ्या अर्थाने बर्फ तयार होत नसे.
१८५७ च्या क्रांतीमुळे बर्फाचा व्यवसाय ढासळला
असं सांगितलं जातं की, ब्रिटिश काळात न्यू इंग्लंडमधून भारतात बर्फाची निर्यात १८५६ मध्ये जास्त होत होती. त्या काळात सुमारे १,४६,००० टन बर्फ भारतात पाठवला गेला होता. मात्र १८५७ च्या क्रांतीनंतर हा व्यवसाय डळमळीत झाला.
१८७४ मध्ये चेन्नई येथे इंटरनॅशनल आइस कंपनीची, तर १८७८ मध्ये बंगाल आइस कंपनीची स्थापना झाली. ‘कलकत्ता आइस असोसिएशन’ म्हणून एकत्र काम करत, या कंपन्यांनी नैसर्गिक बर्फाला बाजारातून हळूहळू बाहेर काढले.