मुलांचे खेळ खेळणाऱ्या मोठ्या माणसांच्या विसाव्याचं ‘किडल्टिंग’ म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 08:35 IST2026-02-13T08:35:05+5:302026-02-13T08:35:37+5:30
मोठी माणसं लहान मुलांची खेळणी-सिनेमे यात रमतात, व्हिडीओ गेम्स खेळतात, हे ‘बालिश’ नाही. ते महत्त्वाचं आणि विसाव्याचंही ठिकाण आहे!

मुलांचे खेळ खेळणाऱ्या मोठ्या माणसांच्या विसाव्याचं ‘किडल्टिंग’ म्हणजे काय?
प्रौढत्वी निज शैशवास जपणे - असं आपल्याकडे केशवसुत म्हणून गेलेच आहेत. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ म्हणजेच किडल्टिंग. गेल्या काही वर्षांत ‘किडल्टिंग’ हा एक नवीन ट्रेंड जगभर रूढ होताना दिसत आहे. ‘किड’ म्हणजे मूल आणि ‘अडल्ट’ म्हणजे प्रौढ या शब्दांच्या मिश्रणातून ‘किडल्टिंग’ ही संकल्पना उदयाला आली आहे. प्रौढ व्यक्ती लहान मुलांच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये, छंदांमध्ये किंवा वस्तूंमध्ये रमतात, आपल्या बालपणी जे नव्हतं ते आता प्रौढ वयात आनंदाने करून बघतात तेव्हा ते ‘किडल्टिंग’ मानलं जातं.
लेगो सेट्सशी खेळणं, ॲक्शन फिगर्सचा संग्रह करणं, ॲनिमेटेड सिनेमे पाहणं, व्हिडीओ गेम्स खेळणं, चित्रांची पुस्तकं रंगवणं, थीम पार्क्सला जाणं अशा सगळ्या गोष्टींमध्ये मन रमवणारे प्रौढ लोक आजूबाजूला असतील तर ते ‘किडल्टिंग’मध्ये रमले आहेत समजा. ‘किडल्ट’ हा शब्द १९८० आणि १९९० च्या दशकात वापरात आला. त्यावेळी तो प्रामुख्याने तरुणांच्या जगण्याशी, त्यांच्या जगण्यातल्या ट्रेंड्सशी जवळीक साधू पाहणाऱ्या प्रौढांचं वर्णन करण्यासाठी वापरला जात असे. त्यात काहीशी नकारात्मक छटा होती. मात्र, २०२० नंतर किडल्टिंग हे काहीसं सकारात्मकतेकडे झुकू लागलं.
कोविड काळातील लॉकडाऊनमध्ये अनेक प्रौढांनी ताणतणाव कमी करण्यासाठी, मानसिक समाधानासाठी त्यांचे जुने छंद नव्याने जोपासण्यास सुरुवात केली. अनेक उत्पादक कंपन्यांनीही या बदलाची दखल घेत प्रौढांसाठी विशेष उत्पादनांच्या ‘रेंज’ आणण्यास सुरुवात केली. त्यातूनच रेट्रो व्हिडीओ गेम्स, कलेक्टिबल खेळणी आणि जुन्या कार्टून कॅरॅक्टर्सच्या थीमवर आधारलेली अनेक उत्पादनं बाजारात आली. किडल्टिंगच्या मुळाशी प्रौढत्वाविषयी बदललेली सामाजिक दृष्टी आहे. पूर्वीच्या पिढ्यांच्या तुलनेत आजची पिढी लग्न, घरखरेदी किंवा पालकत्व यांसारख्या जबाबदाऱ्या काहीशा उशिराने पार पाडते. त्यामुळे प्रौढत्व म्हणजे फक्त गंभीर जबाबदारी हा पारंपरिक दृष्टिकोन आता बदलताना दिसतो आहे. विशेषतः ‘मिलेनियल्स’ आणि ‘जेन झी’ पिढ्या इतर जबाबदाऱ्या निभावताना स्वतःच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेताना दिसतात. ते करण्यासाठीचं एक माध्यम म्हणून ते किडल्टिंगकडे पाहतात, असं तज्ज्ञांचं निरीक्षण आहे.
मानसशास्त्रीय दृष्टीने किडल्टिंगकडे ताणतणाव कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून पाहिलं जातं. बालपणातील चांगल्या आठवणी, त्याच्याशी संबंधित गोष्टी व्यक्तीला भावनिक सुरक्षितता मिळवून देतात. त्यांचा शोध घेऊन पुन्हा त्यामध्ये रमल्याने इतर चढउतारांच्या काळातही काहीशी मन:शांती आणि आनंद मिळू शकतो. तज्ज्ञांच्या मते, खेळ आणि सर्जनशीलता या गोष्टी फक्त लहान मुलांसाठी नाहीत. कोणत्याही वयात त्यामध्ये रमल्याने, सहभाग घेतल्याने त्याचा सकारात्मक परिणामच शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दिसतो.
नवीन खेळ शिकणं, नवीन कौशल्य शिकणं, एखादा आवडीचा पदार्थ मनसोक्त खाणं अशी कुठलीही गोष्ट आता मोठे झालो म्हणून आपण मनमोकळेपणाने ती करायची नाही असा एक सर्वसाधारण समज आहे; पण तसं काही नाही. मोठे झालो म्हणजे सगळ्या गोष्टींचा त्यागच करायला हवा असं नाही. मोठेपणाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपण आयुष्यातील छोट्याछोट्या गोष्टींचा निखळ आनंदही उपभोगू शकतो, हेच किडल्टिंग सुचवतं. सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात, त्यातून कुणाचं जगणं अधिक खेळकर आणि सुखकर होत असेल तर किडल्टिंगकडे सकारात्मकपणेच पाहायला हवं.