Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 17:44 IST2025-11-15T17:41:58+5:302025-11-15T17:44:00+5:30
मोमो विकून एखादी व्यक्ती प्रत्यक्षात किती पैसे कमवू शकते. याच उत्सुकतेपोटी एका सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने स्वतः हा व्यवसाय जवळून पाहण्याचा निर्णय घेतला.

Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
गेल्या काही वर्षांत मोमोचा व्यवसाय प्रचंड वेगाने वाढला आहे. मोठ्या शहरांपासून ते अगदी छोट्या गावांपर्यंत या फास्ट फूडला मोठी मागणी आहे. तयार करायला सोपे आणि खायला सोयीचे असल्याने लोक संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीची भूक भागवण्यासाठी मोमोला विशेष पसंती देतात.
भारतातील जवळपास प्रत्येक शहर आणि गल्लीत आज मोमोचा सुगंध सहज अनुभवता येतो. हा स्ट्रीट फूड इतका लोकप्रिय झाला आहे की, जिथे थोडी गर्दी दिसेल तिथे मोमोची एक टपरी हमखास आढळते. यामुळेच लोकांना अनेकदा हा प्रश्न पडतो की, मोमो विकून एखादी व्यक्ती प्रत्यक्षात किती पैसे कमवू शकते. याच उत्सुकतेपोटी एका सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरने स्वतः हा व्यवसाय जवळून पाहण्याचा निर्णय घेतला.
एका तासात ११७ प्लेट्सची विक्री!
व्हिडीओमध्ये क्रिएटरने सांगितले की, या दुकानाची लोकप्रियता इतकी आहे की, फक्त एका तासात तब्बल ११७ प्लेट मोमो विकल्या गेल्या. स्टॉलवर गर्दी इतकी जास्त होती की, त्यांना मध्येच अतिरिक्त मोमो मागवावे लागले. संध्याकाळच्या वेळी रस्त्यावर वर्दळ वाढताच ग्राहकांची रांग आणखी लांबत गेली आणि लोकांचे येणे थांबायचे नाव घेत नव्हते.
मोमोवाल्याची एका दिवसाची कमाई किती?
हा स्टॉल दररोज संध्याकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू असतो. पाच तासांच्या या कालावधीत ग्राहक सतत येत राहतात. एका प्लेट मोमोची किंमत आहे ११० रुपये. व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी एकूण ९५० प्लेट मोमो विकल्या गेल्या. जेव्हा या संपूर्ण विक्रीचा हिशेब केला गेला, तेव्हा एका दिवसाची कमाई जवळपास १ लाख ४ हजार ५०० रुपये एवढी झाली!
क्रिएटरने या आकडेवारीचे विश्लेषण करताना अंदाज व्यक्त केला की, जर दररोज एवढीच विक्री झाली, तर एका महिन्याची कमाई ३० लाख रुपयांपेक्षाही जास्त असू शकते. कोणताही छोटा स्टॉल विचारात घेतल्यास, ही रक्कम खूप मोठी आहे. शिवाय या व्यवसायात गुंतवणूक आणि खर्च कमी असतो.
इन्स्टाग्रामवर क्रिएटर 'cassiusclydepereira' याने पोस्ट केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनी यावर गंमतशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने 'अशा प्रकारे मोमोज कुठे विकले जातात?' असा प्रश्न विचारला, तर दुसऱ्याने 'हा तर दिवसालाच लाखो कमवत आहे' असे म्हटले. आणखी एका युजरने मस्करी करत 'तुम्ही त्यांच्याकडे इंटर्नशिप करू शकता' असा सल्ला दिला.