दोन कुत्रे विमानाने कॅनडाला जाणार, 'बिझनेस क्लास'चं तिकीटही काढलं! जाणून घ्या यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 13:25 IST2023-07-07T13:21:55+5:302023-07-07T13:25:37+5:30
१५ जुलैला दोन्ही कुत्रे निघणार प्रवासाला...

दोन कुत्रे विमानाने कॅनडाला जाणार, 'बिझनेस क्लास'चं तिकीटही काढलं! जाणून घ्या यामागचं कारण
Two Dogs Flight Travel: अमृतसरच्या रस्त्यांवरील दोन कुत्रे बिझनेस क्लासने प्रवास करून लवकरच विमानाने कॅनडात पोहोचणार आहेत. अॅनिमल वेलफेअर अँड केअर सोसायटी (AWCS) च्या डॉ. नवनीत कौर या लिली आणि डेझी या मादी कुत्र्यांना अमृतसरहून कॅनडाला घेऊन जात आहेत. पेपरवर्क पूर्ण झाले असून 15 जुलै रोजी दोघेही दिल्लीहून कॅनडाला जातील. डॉ. नवनीत कौर यांनी सांगितले की, कॅनडाची महिला ब्रँडाने लिली आणि डेझीला दत्तक घेतले आहे. आतापर्यंत तिने 6 श्वानांना परदेशात नेले आहे, त्यापैकी दोन अमेरिकेत तिच्यासोबत राहतात. डॉ. नवनीत यांनी सांगितले की ती स्वतः अमेरिकेत राहते, पण अमृतसर हे तिचे घर आहे. ती तिथेच लहानाची मोठी झाली.
2020 मध्ये, जेव्हा जगभरात लॉकडाऊन होते, तेव्हा त्यांनी AWCS ही संस्था स्थापन केली. अमृतसरमध्ये सुखविंदर सिंग जॉली यांनी पदभार स्वीकारला आणि संस्थेचे काम पुढे नेले. डॉक्टर नवनीत यांनी सांगितले की, लिली आणि डेझी जवळपास महिनाभरापासून संस्थेत राहत आहेत. दोन्ही मादी कुत्र्यांची प्रकृती बिकट अवस्थेत असताना या संस्थेद्वारे त्यांनी उपचार केले आणि घर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला.
डॉ नवनीत यांनी सांगितले की, आपण भारतीयांनी आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे. आम्ही रस्त्यावरील कुत्रे पाळत नाही. आम्ही त्यांना देशी कुत्रे मानतो. हे कुत्रे कॅनडामध्ये परदेशी म्हणून ओळखले जातात. त्यांना आनंदाने दत्तक घेणारे लोक असतात. कारण भारतीय कुत्र्यांची जात अधिक मैत्रीपूर्ण आणि काळजी घेणारी आहे. यामुळेच कॅनडातील महिलेला हे कुत्रे दत्तक घ्यायचे आहेत. या कुत्र्यांना कॅनडाला पाठवले जात आहे, तिथे त्यांची चांगली काळजी घेतली जाईल.