सिरमौर - हिमाचल प्रदेशच्या सिरमौर जिल्ह्यात शिलाई गावात अलीकडेच एका अनोख्या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. जिथे एका मुलीसोबत दोन भावांनी लग्न केले आहे. शिलाई गावातील प्रदीप नेगी आणि कपिल नेगी यांनी कुनहाट गावच्या सुनीता चौहानसोबत लग्न केले आहे. हा विवाह एकमेकांच्या सहमतीने आणि सामुहिक पद्धतीने करण्यात आला. हा विवाह हाटी समुदायाच्या परंपरेनुसार करण्यात आला. ज्यात एकाच पत्नीला दोन किंवा अधिक भावांमध्ये शेअर केले जाते.
कुटुंब आणि परंपरेचा मिलाफ
ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, प्रदीप नेगी जलशक्ती विभागात कार्यरत आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ कपिल परदेशात हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात कार्यरत आहे. जरी दोघांची जीवनशैली आणि देश वेगवेगळे असले तरी दोन्ही भावांनी मिळून ही परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला. प्रदीप म्हणाले की, हा आमचा संयुक्त निर्णय होता. हे विश्वास, काळजी आणि सामायिक जबाबदारीचे नाते आहे. आम्ही ही परंपरा उघडपणे स्वीकारली कारण आम्हाला आमच्या परंपरेचा अभिमान आहे. तर मी परदेशात असलो तरी या लग्नाद्वारे आम्ही माझ्या पत्नीला स्थिरता, आधार आणि प्रेम देण्यासाठी वचनबद्ध आहे असं कपिल नेगी यांनी म्हटलं.
वधूने काय म्हटले?
हा माझा स्वतःचा निर्णय होता. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. मला ही परंपरा माहित आहे आणि मी ती माझ्या स्वेच्छेने स्वीकारली आहे असं नव्या नवरीने सांगितले. या अनोख्या लग्नात शेकडो गावकरी आणि नातेवाईक उपस्थित होते. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात पारंपारिक ट्रान्स-गिरी पदार्थ बनवण्यात आले आणि डोंगराळ लोकगीतांवर नाचणाऱ्या गावकऱ्यांनी लग्नाला उत्सवाचे स्वरूप दिले. आमच्या गावातच तीन डझनहून अधिक कुटुंबांमध्ये दोन किंवा तीन भावांना एकच पत्नी असते. परंतु असे विवाह सहसा शांतपणे होतात. हे लग्न प्रामाणिकपणे आणि सन्मानाने सार्वजनिकरित्या साजरे करण्यात आले, जे त्याला खास बनवतात असं स्थानिक लोक म्हणतात
दरम्यान, ट्रान्स-गिरी प्रदेशात बहुपत्नीत्वाच्या परंपरेमागे अनेक व्यावहारिक कारणे आहेत. जसे की वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन रोखणे, महिलांना विधवा होण्यापासून संरक्षण देणे आणि कुटुंबात एकता राखणे. विशेषतः जेव्हा भावांना कामासाठी दूर जावे लागते. आता हाटी समुदायाला अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा देण्यात आला आहे.