इथे २०० रूपयात विकत मिळते हिऱ्याची खाण, अलिकडे एका मजुराला सापडला ४० लाखांचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:05 IST2025-07-11T16:57:48+5:302025-07-11T17:05:23+5:30
Panna Interesting Facts : अलिकडे एका मजुराने इथे २०० रूपयात हिऱ्याची खाणं विकत घेतली आणि इथे खोदकाम केल्यावर त्याला ४० लाख रूपये किंमतीचा हिरा लागला.

इथे २०० रूपयात विकत मिळते हिऱ्याची खाण, अलिकडे एका मजुराला सापडला ४० लाखांचा हिरा
Panna Interesting Facts : कधीतरी चमकदार हिरे हाती लागावे आणि आपलं नशीब चमकावं असं अनेकांना वाटत असतं. हे स्वप्न उराशी बाळगून अनेक लोक मध्य प्रदेशच्या पन्ना येथे जातात. यातील काहींचं नशीब चमकतं तर काहींना रिकाम्या हातानं परतावं लागतं. अलिकडे एका मजुराने इथे २०० रूपयात हिऱ्याची खाणं विकत घेतली आणि इथे खोदकाम केल्यावर त्याला ४० लाख रूपये किंमतीचा हिरा लागला. माधव कृष्णा असं या व्यक्तीचं नाव असून तो एक आदिवासी मजूर आहे.
पन्नामधून दरवर्षी अशी एक ना एक अशी घटना समोर येते, जिथे खोदकाम करून लोकांना मौल्यवान हिरे सापडले आणि ते लखपती झालेत. एका अंदाजानुसार, मध्य प्रदेशच्या बुंदेलखंड भागातील पन्ना जिल्ह्यात १२ लाख कॅरेट हिरे भांडार आहे. म्हणूनच अनेक परिवार इथे येता आणि खोदकाम करून हिरे शोधतात.
पन्नामध्ये लोक केवळ २०० रूपयांची खाण खरेदी करतात. हिऱ्याच्या खाणीचा पट्टा पन्ना येथील हिरे कार्यालयातून मिळतो. सरकारी नियमानुसार इथे ८ बाय ८ मीटरचा पट्टा अर्ज केल्यावर दिला जातो. या जमिनीच्या तुकड्यात लोक खोदकाम करू शकतात. जमीन घेतल्यावर हिरा मिळेलच असं काही नाही. नशीब जर जोरावर असेल तर कमी मेहनत करूनही हिरा सापडतो.
पट्टा घेणाऱ्या परिवाराला खोदकाम करून केवळ हिरा काढायचा असतो. हिरा मिळाला किंवा मिळाला नाही तर खोदलेली सगळी माती खड्ड्यात पुन्हा टाकावी लागते. अनेक वर्षांपासून लोक हेच काम करत आहेत. पण दरवर्षी एखाद दुसऱ्या व्यक्तीचंच नशीब चमकतं.
जेव्हाही कुणाला हिरा सापडतो तेव्हा तो सरकारी कार्यालयात जमा करावा लागतो. त्यानंतर सरकारकडून त्याचा लिलाव करण्यात येतो. यासाठी हिरा सापडलेल्या व्यक्तीला ५ हजार फी जमा करावी लागते. जेणेकरून लिलाव करता यावा. लिलावात हिरा विकल्या गेल्यावर १२ टक्के रॉयल्टी कापून ८० टक्के रक्कम हिरा शोधणाऱ्या व्यक्तीला दिली जाते.