'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 15:48 IST2024-07-04T15:48:00+5:302024-07-04T15:48:52+5:30
Offbeat News : पत्र लिहून चोराने सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले.

'तुमचे सर्व सामान परत करतो', आधी केली चोरी, मग पत्र लिहून चोराने मागितली माफी...
Latest Viral News:तामिळनाडूतूनचोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. एक चोरटा निवृत्त शिक्षकाच्या घरातील सर्व सामान घेऊन पसार झाला. मात्र चोरीनंतर त्याने चिठ्ठी लिहून त्या व्यक्तीची माफीही मागितली. विशेष म्हणजे, त्याने एका महिन्यात चोरी केलेल्या सर्व वस्तू परत करण्याचे आश्वासनही दिले. सध्या परिसरात या अनोख्या चोरीच्या घटनेची जोरदार चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघनापुरममधील सथानकुलम रोडवर ही घटना घडली. येथे राहणारे सेल्विन आणि त्याची पत्नी दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत. 17 जून रोजी ते चेन्नईत आपल्या मुलाला भेटायला गेले होते. या जोडप्याने त्यांच्या अनुपस्थितीत घराच्या साफसफाईसाठी सेल्वी नावाची मोलकरीण कामाला ठेवली आहे. 26 जून रोजी सेल्वी घरी पोहोचली, तेव्हा तिला धक्का बसला. घरातून 60 हजार रुपये रोख, 12 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि सर्व सामान गायब होते. यानंतर तिने तात्काळ सेल्विन यांना माहिती दिली.
पोलिसांना माफीपत्र मिळाले
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराची झडती घेतली तेव्हा त्यांना चोराने सोडलेले माफीपत्र सापडले. यामध्ये चोराने माफी मागितली होती आणि एका महिन्याच्या आत चोरी केलेले सर्व सामान परत करण्याचे आश्वासन दिले होते. आता तो चोर आपला शब्द पाळतो का, हे येत्या महिन्याभरात कळेल. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.