दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 19:16 IST2026-04-04T19:08:54+5:302026-04-04T19:16:37+5:30
दातदुखीच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. पण काहीवेळा हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. अशीच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे.

दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
दातदुखीच्या समस्येने अनेक जण त्रस्त असतात. पण काहीवेळा हा त्रास जीवघेणा ठरू शकतो. अशीच एक हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. डेवन वँटरपूल हा तरुण एका साध्या दातदुखी आणि हिरड्यांना आलेल्या सुजेवर उपचार करण्यासाठी डेंटिस्टकडे गेला होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होतं. हिरड्यांमधून रक्त येत होतं आणि थोडी सूज होती. मात्र काही तासांतच परिस्थिती भयानक बनली. फ्लू सारखी लक्षणं, थंडी वाजणं आणि शरीरात आलेला अशक्तपणा यावरून हे लक्षात आलं की ही काही साधी समस्या नाही. डेवनची पार्टनर एलिसिया वाइल्डरने सांगितलं की, सुरुवातीला त्यांना हा किरकोळ आजार वाटला, पण प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे दोन दिवसांनंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं.
रुग्णालयात डॉक्टरांनी सांगितलं की, डेवन 'सेप्टिक शॉक' मध्ये होता. याचा अर्थ शरीरात इन्फेक्शन अत्यंत वेगाने पसरत होतं आणि महत्त्वाचे अवयव हळूहळू निकामी होत होते. जर तातडीने उपचार केले नसते, तर त्याच्या जीवाला धोका होता. शरीरातील इतर अवयवांना वाचवण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला. या प्रक्रियेत डेवनचा उजवा पाय, डाव्या पायाचा गुडघ्यापासून खालचा भाग आणि दोन्ही हात कापून टाकावे लागले. हा निर्णय कठीण होता, पण यामुळेच त्याचा जीव वाचवणं शक्य झालं.
हिरड्यांमधून इन्फेक्शन कसं पसरलं?
डेंटिस्टकडे गेल्यावर त्याच्या हिरड्या कमकुवत झाल्या होत्या आणि त्यांना सूज आली होती. हिरड्यांमधून रक्त येत असल्यामुळे बॅक्टेरिया थेट शरीरात शिरले. सामान्यतः आपल्या तोंडात बॅक्टेरिया असतात, परंतु रक्ताद्वारे ते वेगाने पसरून गंभीर इन्फेक्शन निर्माण करू शकतात. डेवनच्या बाबतीत नेमके हेच घडलं. एलिसियाने सांगितलं की, डेंटिस्टकडून परतल्यानंतर अवघ्या ४५ मिनिटांतच डेवनला जोरात थंडी वाजून शरीर थरथरू लागले, उलट्या आणि जुलाब सुरू झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर आणि लाईफ सपोर्ट मशीनवर ठेवावे लागले.
'पर्पुरा फुलमिनन्स' म्हणजे काय?
डेव्हनला 'पर्पुरा फुलमिनन्स' या अत्यंत दुर्मिळ आणि धोकादायक आजाराचा सामना करावा लागला. या स्थितीत त्वचा आणि टिशू वेगाने मरू लागतात, ज्याला 'नेक्रोसिस' म्हणतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास इन्फेक्शन संपूर्ण शरीरात पसरून मृत्यू ओढवू शकतो. डेवनची ही गोष्ट आपल्याला सावध करते की, कधीकधी साधी वाटणारी वेदनाही जीवघेणी ठरू शकते आणि अशा वेळी वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.